विदर्भ

कारखाना बंदीमुळे २५ हजार कुटुंबांची वाताहात; जगण्याचे वांदे

सकाळ वृत्तसेवा

उमरखेड (जि. यवतमाळ) : आपल्या परिसरात एखादा मोठा उद्योग उभा राहावा. ज्यामुळे अनेक हातांना काम मिळावे, समृद्धी नांदावी, हीच मनीषा उरी बाळगून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Former Chief Minister Vasantrao Naik) यांनी महत्प्रयासाने वसंत साखर कारखाना (Spring Sugar Factory) सुरू केला. १९७२-७३ मध्ये पहिले गाळप झाले आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला. मोठ्या संख्येने शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळले. हजारो हातांना काम मिळाले. एका कारखान्याच्या भरोशावर कित्येक कुटुंबीयांचे उदरभरण होऊ लागले. समृद्धी नांदू लागली. राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप होणारा कारखाना म्हणून ‘वसंत’ने अल्पावधीत नावलौकिक मिळविला. (25,000-families-affected-due-to-factory-ban)

तब्बल ४७ वर्षे अव्याहत सुरू असलेल्या वसंत कारखान्याला अंतर्गत राजकारण, सभासदांमधील हेवेदावे यांचा फटका बसला. वाढती थकबाकी आणि बॅंकेने प्रशासक नियुक्त केल्याने २०१७-१८ मध्ये ‘वसंत’च्या यंत्रांची घरघर बंद झाली. हजारो हात क्षणात बेरोजगार झाले. कारखान्यावर अवलंबून असणारे शेतकरी, मजूर, वाहतूकदार, कर्मचारी साऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. आज कारखान्यावर बॅंकेचे कर्ज आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. उसतोड कामगार, शेतकरी आदींची देणी थकली आहेत. मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची क्षमता असलेला, हजारो हातांना काम देणारा कारखान्याचा ‘वसंत’ पुन्हा फुलायलाच हवा. त्यासाठी राजकारण्यांनी आपली शक्ती पणास लावावी.

विदर्भातील सहकार क्षेत्रात अल्पावधीत मानाचे स्थान मिळविणारा एकमेव सहकारी साखर कारखाना म्हणजे वसंत सहकारी साखर कारखाना. विदर्भात सहकारी संस्था व्यवस्थित चालविल्या जात नाही, ही धारणा पूर्णतः चुकीची असल्याचे या कारखान्याने घवघवीत यश मिळवून दाखवून दिले. राज्यातील सर्वात मोठा, विदर्भ-मराठवाड्यातील तालुक्यांचे अर्थचक्र अवलंबून असलेला, अव्याहत तब्बल ४५ वर्षे चालणारा कारखाना म्हणून वसंत सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक असल्याची कारखान्याची महती जो तो कथन करीत होता. या कारखान्यानंतर सुरू झालेले विदर्भातील अनेक साखर कारखाने चाचणी हंगामात ऊस गाळप करून बंद पडले. परंतु, वसंत तब्बल ४५ वर्षे सुरूच राहिला. हजारो हातांना काम देणारा हा कारखाना सुरू व्हावा, अशी इच्छा प्रत्येक जण बोलून दाखवत होता.

वसंत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उभारलेले सहकारी तत्त्वावरील दोन साखर कारखाने चालविण्यात राज्यस्तरीय दोन तत्कालीन नेत्यांना यश आले नाही. परंतु अशाही परिस्थितीत वसंत सहकारी साखर कारखान्याची वाटचाल अखंडपणे सुरूच होती. असे असताना गेल्या काही वर्षांपूर्वी अडचणीच्या काळात कारखान्याला उतरती कळा लागली आणि कारखान्याची अधोगती सुरू झाली. कारखान्याच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेल्या प्रकाश पाटील देवसरकर यांची शेवटच्या काळातील राजकीय असमर्थता, राज्य बॅंकेने ऐनवेळी प्रशासक नेमला.

कारखान्याची थकबाकी देण्यासंदर्भात बॅंकेने नियम कठोर केले. त्यातच राज्य शासनाची हतबलता. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळाने हा कारखाना जिल्हा बॅंकेकडे वर्ग करून जिल्हा बॅंकेचे कर्ज घेतले. येथून कारखान्याला उतरती कळा लागली. जिल्ह्याचे अंतर्गत राजकारण, राजकीय कुरघोडी व वर्चस्वाच्या लढाईत कारखान्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. परिणामी देणी वाढल्याने वेळेवर कच्चा माल उपलब्ध न झाल्याने यंत्र थांबले आणि हजारो लोकांची रोजीरोटी बंद झाली. कारखान्यावर अवलंबून असणारे शेतकरी, ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंबीय, लघु व्यावसायिक, वाहतूक यंत्रणा, ठेकेदार, ट्रक, ट्रॅक्टर आदी सारेच ठप्प झाले.

दररोज अडीच हजार मेट्रिक टन गाळप

साखर कारखान्यात दररोज तब्बल अडीच हजार मेट्रिक टन गाळप व्हायचे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आनंदात होते. वसंतमुळे सर्वत्र रोजगारांची भरमार असल्याने उमरखेड, महागाव, पुसद, हदगाव, हिमायतनगर आणि किनवट परिसरात समृद्धी नांदत होती. कारखान्याच्या शेवटच्या दिवसांत अडीच हजार टन गाळप क्षमता असताना ३३ मेट्रिक टनापर्यंत गाळप करण्याचा उच्चांक आहे. ज्यांनी दिवस-रात्र मेनहत करून कारखान्याल एवढे समृद्धीचे दिवस दाखवले, कारखान्याच्या दुरवस्थेत तेसुद्धा भरडले गेले.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे यश

त्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वसंतराव नाईक विराजमान होते. आपल्या परिसरात मोठा कारखाना व्हावा. या माध्यमातून हजारो हातांना काम मिळावे, ही त्यांची इच्छा होती. याच अपेक्षेने त्यांनी साखर कारखान्यासाठी प्रयत्न केले. मात्र केंद्राने सर्वेक्षणाशिवाय कारखाना देता येणार नाही, अशी अट घातली. त्यावेळी वसंतराव नाईक यांनी आपला परिसर ऊस उत्पादनाने समृद्ध आहे, असे सांगून सर्वेक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा या परिसरात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. परंतु आपला शेतकरी कष्टीक आहे. मेहनतीने काळ्या आईच्या उदरातून तो नक्कीच उसाची समृद्धी पिकवेल, हा विश्वास नाईक यांना होता. म्हणूनच त्यांनी सर्वेक्षणाला आलेल्या चमूला हवाई सर्वेक्षणातून ज्वारीच्या पिकाला ऊस म्हणून दाखविले आणि मान्यता मिळविली. सुदैवाने कारखाना सुरू होताच शेतकरी मोठ्या संख्येने ऊस उत्पादनाकडे वळले आणि हजारो हातांना काम मिळाले. आपले स्वप्न साकार झाल्याचे समाधान त्यावेळी नाईक यांच्या चेहऱ्यावर होते.

हजारो शेतकऱ्यांची कामधेनू बंद होणे, ही अतिशय वाईट बाब आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनात हा कारखाना पुन्हा सुरू व्हावा. शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, या हेतूने प्रयत्न सुरू आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी माझी आग्रही भूमिका आहे. त्यासाठी निवेदन दिले. टेंडर काढले. परंतु पहिल्या टप्प्यात आवश्यकतेपेक्षा कमी टेंडर आल्याने निविदा रद्द झाली. ती पुन्हा नव्याने काढून कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. राजकीय हेवेदावे, सत्ता संघर्षात कारखाना सुरू होण्यास विलंब होत आहे.
- हेमंत पाटील, खासदार, हिंगोली लोकसभा मतदारसंघ
वसंत साखर कारखान्यावर हजारो लोकांचे पोट आहे. कारखाना सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याच्या प्रकरणात टेंडरचा घोळ होता तोसुद्धा आता निस्तरण्यासाठी हालचाली सुरू आहेत. राज्य शाससाने कारखान्याच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन तो लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- नामदेव ससाणे, आमदार उमरखेड मतदारसंघ

(25,000-families-affected-due-to-factory-ban)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT