चंद्रपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे ६५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ६५ फूट उंचीचे स्मारक चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर तयार केले जाणार आहे. यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ५६ कोटी ९० लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्मारकाव्यतिरिक्त या निधीतून इतर विकासाची कामे केली जाणार आहेत. यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीत नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौद्धधम्माची दीक्षा दिली होती. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झाला आहे. मात्र, चंद्रपूर येथील दीक्षाभूमी शासनदरबारी उपेक्षित राहिली. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने येथे देशभरातून अनुयायी येतात. त्यांच्यासाठी येथे कोणत्याही सुविधा नव्हत्या. परिणामी त्यांची गैरसोय होते. या अनुशंगाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न केले.
आमदार जोरगेवार यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती. त्यांनी दीक्षाभूमी समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून आणली होती. सत्ता परिवर्तनानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता.
अखेर त्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात घोषणा केली होती. त्या अनुषंगाने चंद्रपूरच्या दीक्षाभूमी विकासासाठी उच्चाधिकार समितीच्या वतीने ५६ कोटी ९० लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करत तो वित्त व नियोजन विभागाकडे अंतिम मान्यतेकरिता पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव उच्चस्तरीय शिखर समितीने मंजूर करून वित्त व नियोजन विभागाकडे पाठविला. त्याला मंजुरी दिल्यानंतर सामाजिक न्याय विभागानेही या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या कामाला सुरुवात होणार असून, दीक्षाभूमीच्या विकासाची नवी दिशा ठरवली जाणार आहे.
कायापालट होणार
या निधीतून येथे ६५ फूट उंचीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भित्तिचित्रे, सुरक्षा भिंत, बुद्धविहार, परिसर सौंदर्यीकरण, भव्य वाहनतळ व्यवस्था, सभामंडप यासह इतर अनुषंगिक कामे केली जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.