अचलपूर शहरात झेंडा काढण्यावरून झालेल्या वादातील दोन्ही गटातील संशयित आरोपींना न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अचलपूर - शहरात झेंडा (Flag) काढण्यावरून झालेल्या वादातील (Dispute) दोन्ही गटातील संशयित आरोपींना पोलिसांनी (Police) आज न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत (Custody) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या अचलपूर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस शहरावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
अचलपूर शहरात रविवारी सायंकाळी दहाच्या सुमारास झेंडा काढण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद नंतर विकोपाला गेला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने शहरात रविवारी सायंकाळी साडेअकरा वाजता जमावबंदी लावण्यात आली होती. सध्या अचलपुरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मात्र कायम ठेवला आहे.
शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अचलपूर, परतवाडा, कांडली, देवमाळी या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती, मात्र मंगळवारी दुपारी १२ ते १ आणि सायंकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत संचारबंदीत शिथिलता देण्यात आली.
याप्रकरणी आज दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण २४ जणांना अटक करण्यात आली आहे, तर १५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणात पिंपरी चिंचवड येथून भाजपचे शहरअध्यक्ष अभय माथने यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज रात्रीपर्यंत त्यांना अचलपूरात आणण्यात येईल, असे अतीरिक्त पोलिस अधीक्षक शशीकांत सातव यांनी सांगितले.
सध्या अचलपुरात भयाण शांतता पसरली आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. यामध्ये अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, धारणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गौर हसन, जुळ्या शहरातील तिन्ही ठाणेदारांसह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, पोलिस अधीक्षक व पोलिस प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार खासदार नवनीत राणा यांचा आजचा अचलपूर-परतवाडा दौरा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. नवनीत राणा बुधवारी (ता. २०) दुपारी तीन वाजता अचलपूरला पोहोचणार आहेत. त्या पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधतील, असे सांगण्यात येते.
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी आज दुपारी १२ ते २ व त्यानंतर सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत संचारबंदीत शिथिलता देण्यात आली होती. सध्या शहरात शांतता आहे. अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये.
- संदीपकुमार अपार, उपविभागीय पोलिस अधिकारी, अचलपूर.
झेंडा विवादप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांचा पीसीआर मंजूर केला आहे.
- माधवराव गरुड, पोलिस निरीक्षक, अचलपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.