अकोला : ‘पह्यले आप’, ‘नही, पह्यले आप’ म्हणत नेमका निर्णय घ्यायचा नाही. आणि ट्रेन सोडून द्यायची. ही विनोदी कथा चिरपरिचित आहे. सरकारी विनोदाची अशीच एक ‘काळी कथा’ तेल्हारा तालुक्यात (Telhara district) ‘कुख्यात’ आहे. ‘अकोट-हिवरखेड-खांडवा रेल्वेमार्ग’ मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून (Melghat Tiger Reserve) बांधायचा की पर्यायी मार्गाने, यावर सरकारचा निर्णय होत नाही. त्यामुळे ‘विकासाची ट्रेन’ गेल्या पाचएक वर्षांपासून निघून जात आहे. सरकारने विकासाचा ‘विनोद’ करून तेल्हारा तालुक्याचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे. लोकप्रतिनिधीही या विनोदाचे दोषी भागीदार आहेत. (Administration and politicians ignorance about train line in South Vidarbha)
बुलडाणा जिल्ह्याचा दौरा आटोपून अकोला गाठले. ‘सकाळ’चे अकोला जिल्हा बातमीदार मनोज भिवगडे यांनी स्वागत केले. अकोला जिल्ह्यातील संपूर्ण प्रश्नांवर अकोला टीमसोबत चर्चा केली. सकाळच्या बसने अकोला निंबा मार्गाने निघालो. निंब्यापर्यंत रस्ता खराब होता. अडसूळ ते तेल्हारा मार्ग खोदून ठेवल्याने रस्त्यावर धूळ उडत होती. तेल्हाऱ्याला पोहोचताच ‘सकाळ’चे तेल्हारा तालुका बातमीदार कृष्णा फंदाट यांनी स्वागत केले. दुचाकीने टॉवर चौकात अनिल रेस्टॉरंटमध्ये रश्याच्या आलुवड्याचा आस्वाद घेतला. मानकर चौकातील मानकर टी पॉइंटवर चहा घेत तालुक्यातील समस्यांवर चर्चा केली. त्यानंतर हिवरखेडला निघालो. तेथे ‘सकाळ’चे बातमीदार सदानंद खारोडे आणि धीरज बजाज यांची भेट झाली. मग आम्ही झरी वाण स्टेशनमार्गे निघालो.
पश्चिम विदर्भाला मध्य प्रदेशासोबत आणि दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून सिकंदराबाद जयपूर मीटरगेज रेल्वे मार्ग ओळखला जातो. हे महत्त्व ओळखूनच या मार्गाचे काम स्वातंत्र्योत्तर काळात १९५५ मध्ये सुरू झाले. पूर्वी या मार्गावर रेल्वे नियंत्रित वेगाने चालत होती. त्यामुळे नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी विलंब लागत असल्याने गेज परिवर्तनाचा घाट घालण्यात आला. रेल्वेमार्गावरील पूल जमीनदोस्त करण्यात आले. जुना मार्ग व्याघ्र प्रकल्पातून अकोट, हिवरखेड, वान स्टेशन, तुकैथल, आमला खुर्द असा होता. परंतु शासनाने मेळघाट व्याघ्र प्रकल्प घोषित केला.
त्यामुळे काम बंद पडले. त्यामुळे आदिवासींचा रोजगार तर हिरावलाच; शिवाय मध्य प्रदेशासोबत असणारी व्यापारी देवाणघेवाण कमी झाली. जुना मार्ग ५१ किमी जंगलातून तर ३८ किमी व्याघ्र प्रकल्पातून जातो. यातील २३ किमी रेल्वेमार्ग गाभा क्षेत्रातून जातो. ब्रॉडगेज रेल्वेमुळे व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. यामुळे रेल्वे मार्ग बाहेरून काढावा यासाठी वन्यजीवप्रेमींनी शासनाला निवेदन पाठविले. परंतु तेल्हारा तालुक्यातील अकोट-हिवरखेड-खांडवा या रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन करून रेल्वे धावली तरच पश्चिम विदर्भ सावरेल, यात दुमत नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
कोणत्याही शहराचा विकास त्या शहराजवळून जाणारे महामार्ग आणि रेल्वेमार्गांवर अवलंबून असतो. तेल्हारा तालुक्यातून सध्यातरी कोणताही रेल्वेमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग देखील जात नाही. त्यामुळेच येथे कोणतेही मोठे उद्योग उभे राहिले नाहीत. दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी तालुक्याचा विकास खुंटला आहे.
पर्यायी मार्गाने २०.३७ किलोमीटर अंतर वाढणार आहे; पण अडीच लाख लोकांना या मार्गाचा फायदा होऊ शकतो. व्याघ्र प्रकल्पाच्या २३ किलोमीटर गाभा क्षेत्रातून रेल्वे जाणार नाही. त्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका राहणार नाही. तसेच प्रदूषणदेखील टाळता येईल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांनीही सांगितला पंतप्रधानांना पर्याय
जुना मार्ग हिवरखेड, वान रोड, तुकैथल, खांडवा असा जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यायी मार्ग अकोट, हिवरखेड, सोनाळा, टुनकी, कुंवरदेव असा सुचविलेला आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातून रेल्वेमार्ग बांधण्याची गरज नाही, असे सांगितले.
आदिवासींचा रोजगार घटला
तालुक्यातील आदिवासीबहुल पट्ट्यातून १५ किलोमीटर जुना रेल्वे मार्ग जात होता. दरम्यान, चार-पाच स्टेशन लागत होते. या स्टेशनवर आदिवासी बांधव खाद्य वस्तू, पाणी बॉटल, खाद्यपदार्थ, रानमेवा विकून चार पैसे मिळवत होते; पण आता रेल्वे बंद झाल्याने त्यांचा रोजगार हिरावला आहे.
व्यापाऱ्यांनाही फटका बसला
परिसरातील अनेक व्यापारी व घरगुती विक्रेते रेल्वे मार्गाचा उपयोग करूनच इंदूर-उज्जैन येथून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वस्तू, कापड व अन्य वस्तू खरेदी करायचे. परंतु हा रेल्वे मार्ग बंद झाल्याने आता त्यांना भुसावळ किंवा नागपूरमार्गे मध्यप्रदेशला जावे लागते. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
सिकंदराबाद-जयपूर मार्गावरील अकोट-हिवरखेड-खंडवा रेल्वे मार्गाचे काम रखडले. त्यामुळे आदिवासी समुदायाची जीवनवाहिनी थांबली आहे. रोजगारही गेला. मध्य प्रदेशातील नातेवाइकांच्या भेटी घेणे कठीण झाले. श्रेय कुणीही घ्या. परंतु काम त्वरित पूर्ण करा.-दयाराम कासोटे, पिंपरखेड
रेल्वेमार्ग तेल्हारा, सोनाळा, जळगाव जामोद या गावांना जोडून पुढे नेला तर तीन तालुकत्यातील सुमारे अडीच लाख लोकांना लाभ होईल. दळणवळण सोयीचे होईल. विकास होईल. या गोष्टीचा विचार प्रशासनाने करावा.-दयालसिंह बलोदे, माजी नगराध्यक्ष, तेल्हारा
(Administration and politicians ignorance about train line in South Vidarbha)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.