अमरावती : लॉकडाउनच्या काळात घरी परत येण्यासाठी एका युवकाने औरंगाबाद येथे चक्क दुचाकी चोरून अमरावती गाठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा युवक अवघ्या २० वर्षांचा असून चोरी करण्यात अतिशय तरबेज असल्याचे पोलिस तपासात समजले. त्याच्याविरोधात आतापर्यंत तब्बल ३० चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
बाईक चोरी करणारा हा युवक काही दिवसांपासून पोलिसांपासून लपण्यासाठी गोव्यात होता. तो कसाबसा गोव्यातून औरंगाबाद येथे पोहचला. परंतु साधन नसल्यामुळे त्याने औरंगाबाद येथे काही दिवस थांबून दुचाकी चोरली. त्यात बऱ्यापैकी इंधन असल्याने तो त्याच चोरीच्या दुचाकीने मोर्शी तालुक्यातील येरला गावात पोहचला.
वैभव आडोळे (वय २०) असे त्याचे नाव. सुरवातीपासूनच चोरीचा माल विकून आलेल्या पैशांमध्ये मौज करणे हाच त्याचा धंदा. शाळेपासूनच चोरीची सवय लागल्याने त्याचे शिक्षणाकडेही दुर्लक्ष झाले. लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबात आई, आजी, लहान भाऊ असे सुखाने नांदतात. घरात मोठा असल्याने त्याने शिकावे किंबहुना चांगल्या मार्गाने जावे अशीच त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु त्याच्यात सुधारणा झाली नाही.
सुमारे तीस चोरीचे गुन्हे
वीस वर्षाचे वय असताना त्याच्याविरुद्ध लॅपटॉप, मोबाईल आणि दुचाकी चोरीचे जवळपास पंचवीस ते तीस गुन्हे आयुक्तालयात दाखल आहेत. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा त्याने गुन्हे केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. गाडगेनगर, राजापेठ, शहर कोतवाली या ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे.
घरी आहे बागायती शेती
त्याच्याकडे बागायती शेती आहे. काळ्या मातीत तो राबला तरी, स्वत:चे आणि कुटुंबीयांना सुखी ठेवू शकतो. परंतु पोलिसांनी केलेले समुपदेशन तसेच , कायद्याच्या बडग्यानंतरही त्याच्यात सुधारणा होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता कुटुंबीयांनी सुद्धा त्याच्या वर्तनाकडे दुर्लक्ष केले आहे.
कारागृहातून सुटताच गोव्यात मौज
साधारण वर्षभरापूर्वी तो मध्यवर्ती कारागृहातून सुटून बाहेर पडला. त्यानंतर पुन्हा त्याने काही दुचाकी, मोबाईल चोरी करून विकल्या. त्यातून आलेल्या पैशातून मौज करण्यासाठी तसेच पोलिसांचे आपल्याकडे लक्ष्य राहू नये याकरिता त्याने गोवा गाठले. अमरावती येथून चोरलेला एक मोबाईल सिंधुदुर्ग तर, दुसरा गोव्यात नेऊन विकला. गोव्यातच काही महिने घालविले. त्यात कालावधीत त्याने कुठेतरी काम केले.
एकाच ठाण्यात पाचव्यांदा पकडले
शहरातील गाडगेनगर पोलिसांनी त्याला सहाव्यांदा पकडले. अल्पवयीन असताना, दोन वेळा तर, सज्ञान (चोर) झाल्यानंतर चौथ्यांदा तो एकाच ठाण्यातील पोलिसांच्या हाती सापडला. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी आता पुन्हा जप्त केल्या.
लहानपणापासूनच चोऱ्या
केवळ चौदा वर्षाचा अल्पवयीन असताना त्याला विद्यार्थ्यांच्या खोलीतून महागडे मोबाईल चोरीप्रकरणात प्रथम पोलिसांनी पकडले. पाच ते सहा मोबाईल, लॅपटॉप जप्तही केले. त्यानंतर पुन्हा चोरी करणार नाही, असे आश्वासन त्याने पोलिसांना दिले. वय कमी असल्यामुळे प्राथमिक कारवाईनंतर पोलिसांना नाइलाजाने त्याला सोडून देणे भाग पडले. पहिल्यांदा ज्यावेळी त्याला पकडले तेव्हा आईने सांगितलेला घटनाक्रम थक्क करणारा ठरला. मुलाला कमी वयात वाईट सवयी लागल्या, म्हणून त्या मातेने ठाण्यात येऊन पोलिसांपुढे अश्रू ढाळले.
वैभव आडोळे याने गुन्हेगारीपासून दूर राहावे. याकरिता पोलिसांनी जेव्हा, जेव्हा त्याला पकडले तेव्हा, तेव्हा त्याचे समुपदेशन करून त्याच्यात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला.
मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.