दिग्रस (जि. यवतमाळ) : शहराच्या मध्यवस्तीतील श्रीराम मंदिर परिसरातील राष्ट्रीय शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (ता. २६) रात्री एक पुरातन पेव आढळून आले. पेव आढळल्याची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. जेथे पेव पडले तो मध्यवस्तीचा परिसर व जवळच असलेली पुरातन गढी यामुळे हे पेव म्हणजे भुयारी मार्गसुद्धा असू शकतो, असा दावा अनेकांनी केला आहे.
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या राष्ट्रीय शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून शुक्रवारी रात्री पाण्याचा टॅंकर चालला होता. रस्त्यावर इंटरलॉकींग टाईल्स बसवलेली होती. अचानक टाईल्स खचली व छोटा खड्डा पडून पाण्याच्या टॅंकरचे एक चाक तेथे फसले. फसलेला टॅंकर नागरिकांच्या मदतीने बाहेर काढल्यानंतर तेथे २५ ते ३० फुटांचा भला-मोठा खड्डा पडल्याचे लक्षात आले. हा खड्डा म्हणजे जुने पेव असल्याचे बोलले जात होते.
जुन्या काळी हा परिसर गढीचा परिसर म्हणून ओळखला जात होता. जुन्या काळी शेतकरी धान्य साठवणुकीसाठी कणगी, पेव, बाळद, लादनी यांचा वापर करीत होते. शेतकऱ्यांना एखाद्या वर्षी भरमसाठ उत्पन्न झाल्यास पुढील दुष्काळाबाबत दूरदृष्टी ठेवून असे पेव ते तयार करायचे आणि या पेवात अन्नधान्याचा साठा करून ठेवला जायचा. ग्रामीण भागातील मोठमोठ्या वाड्यांत आजही हा प्रकार पाहायला मिळतो.
पेव हे नदीच्या किनारी किंवा घराच्या आजूबाजूला मोठे भुयार करून खोदून तयार केले जायचे. काळानुसार हे सर्व इतिहासजमा झालेले आहे. रस्त्याच्या मधोमध खड्ड्यात कोणीही पडू नये म्हणून सध्या टिनपत्रे व बांबू लावून रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पेव बुजवून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्या ज्या ठिकाणी पेव आढळून आले त्या परिसराच्या आजूबाजूस असे अनेक पेव यापूर्वी आढळून आले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक दुर्गामाता चौक परिसरातील बंडू कोठारी मार्गावरील दुर्गामातेची स्थापना करण्याच्या जागेवर १० वर्षांपूर्वी असेच एक पेव आढळले होते. त्यावेळी नगरपालिकेने शंभर ट्रकपेक्षा अधिक मुरूम टाकून हे पेव बुजविले होते. त्यापूर्वी सुद्धा या परिसरात ३ ते ४ पेव पडले असल्याची माहिती जुन्या नागरिकांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.