अमरावती : दोन महिन्यांच्या पिलाच्या मानेपर्यंतचा भाग स्टीलच्या गडव्यात फसला. एक किंवा दोन तास नव्हे तर तब्बल १८ तासांपेक्षा अधिक वेळ झाला. माकडीणने तो गडवा काढण्याचा प्रयत्न केला. तिला शक्य झाले नाही. परंतु वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचेपर्यंत माकडीण बाळाला कुशीत घेऊन बसली होती.
नांदगावखंडेश्वर तालुक्यातील मुंदवाडा गावात गुरुवारी (ता. तीन) अमरावती वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्या पिलाचे तोंड गडव्यातून बाहेर काढून त्याला पुन्हा माकडांच्या कळपात नेऊन सोडले. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही प्रक्रिया पार पडली. पावसाचे दिवस असल्याने जंगलातील माकडांचे कळप मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीमध्ये दिसून येतात. मुंदवाडा गावातसुद्धा काही माकडे या घरावरून त्या घरावर हुंदडत होती. त्यापैकी एका माकडीणचे अवघ्या दोन महिन्यांचे पिलू नुकताच उड्या मारायला शिकले. ते एका घराच्या आवारात उतरले.
तेथे कदाचित स्टीलचे भांडी ठेवली असावी. ते पिलू गडव्याजवळ गेले. गडव्यात डोकावण्याच्या नादात त्याची मान त्यात अडकली. त्याला काहीच दिसेनासे झाले. घाबरून हे पिलू सारखे पळत होते. माकडीण त्यामुळे हैराण झाली. ते पिलू आपलेच असल्याचे तिने हेरले. दुसरीकडे भरकटू नये म्हणून त्या पिलाला आपल्या कुशीत घेतले. मात्र, तो गडवा काही केल्या तिच्याकडून निघाला नाही. ही बाब काही सजग नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनाही पिलाचे हाल आणि त्याच्या आईची तगमग दिसली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले.
रेस्क्यू टीमचे अमोल गावनर पथकासह मुंदवाडा येथे पोहोचले. त्यांनी ट्रॅंक्युलायझर गनने त्या पिलाला बेशुद्ध केले व ताब्यात घेऊन मानेतून स्टीलचा गडवा कापला व पिलास मुक्त करून पुन्हा माकडांच्या कळपात नेऊन सोडले. या पथकात नांदगावखंडेश्वर येथील पशुवैद्यकीय अधिकारी एच. डी. जाधव, रेस्क्यू टीमचे अमोल गावनर, मनोज माहुलकर, सतीश उमक, मनोज ठाकूर, आसिफ पठाण, वैभव राऊत, वैशाली साळुंके सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.