पुसद (जि. यवतमाळ) : भाजपची शिस्तीचा पक्ष म्हणून ओळख आहे. मात्र, पुसद येथील नव्या-जुन्या भाजप कार्यकर्त्यांमधील गटबाजी व बेशिस्तीचा प्रकार अलीकडे चव्हाट्यावर आला आहे. पुसद येथील जुन्या ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्याच्या घरी झालेल्या बैठकीत पुसदच्या भाजप आमदाराची टर उडविणाच्या कारणावरून संतप्त झालेल्या आमदारांनी नगरसेवकाला भलीबुरी सुनावली. अखेर हे प्रकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दरबारात पोहोचले. त्यामुळे पुसद भाजपत सारेच आलबेल नसल्याचे चित्र पक्षश्रेष्ठींची चिंता वाढविणारे आहे.
डिसेंबरमध्ये नगरपालिकेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्ष किसान आघाडीचे पदाधिकारी असलेल्या जुन्या कार्यकर्त्याच्या नाईक चौकालगतच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, जुने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हजर होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नातेवाईक असल्याचे सांगणाऱ्या नगरसेवकाने आमदार यांच्याबाबत टर उडविणारी टीकाटिपणी केल्याचा प्रकार लक्षात आल्याने बैठकीत आमदार चांगलेच भडकले.
यावेळी काही जुन्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आमदारांनी नगरसेवकांसह तीनही ज्येष्ठ कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले व संतापाने बैठकीतून निघून गेलेत. पक्षात नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना जुने कार्यकर्ते सन्मानजनक वागणूक देत नसल्याने जुना-नवा वाद नव्याने उफाळून आला असल्याची चर्चा आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे.
नगरसेवकाला आवरा
भाजप कार्यकर्त्यांमधील मानापमान नाट्य रात्री आणखी रंगले. यावेळी नगरसेवक आमदारांबद्दल माघारी बरळले. ही चित्रफीत आमदारांपर्यंत पोहोचली. एवढेच नव्हे तर नगरसेवकाने आमदार मदन येरावार यांच्याकडे आपल्याच पक्षातील आमदाराबद्दल तक्रार केली. त्यावर येरावार यांनी पुसदला आमदारांना फोन केला. त्यामुळे आमदार पुन्हा भडकले व त्यांनी थेट सुधीर मुनगंटीवार यांना मोबाईलवरून या नगरसेवकाला आवरा, या शब्दांत सांगितले.
पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली
नगरसेवकाने मुनगंटीवार यांच्या माध्यमातून स्वतःच्या प्रभागासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी आणल्याने त्याची चर्चाही भाजप कार्यकर्त्यांत गाजली होती. या बैठकीच्या निमित्ताने पक्षातील गटबाजी, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमधील वादासोबतच जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधील वादामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी मात्र, चांगलीच वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.