उमरखेड (जि. यवतमाळ) : नांदेड येथून नागपूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचालकाला नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने बस नाल्यात वाहून गेली. ही घटना मंगळवारी (ता. २८) सकाळी आठ वाजता उमरखेडपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागाव पुलावर घडली. यात बसच्या वाहकासह तिघांचे मृतदेह सापडलेत. बसचालकाचा शोध अजून लागला नाही; तर, दोन प्रवाशांना वाचविण्यात आले आहे.
नांदेडवरून नागपूरला जाणारी हिरकणी बस (क्र. एमएच १४ बीटी ५०१८) उमरखेड बसस्थानकातून सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी चार प्रवाशांना घेऊन निघाली. नागपूर आगाराच्या या बसचे चालक सतीश सुरेवार हे, तर वाहक भीमराव नागरीकर हे होते. या बसमध्ये चार प्रवासी बसले होते. शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागाव नाल्यावर पुलावरून पाणी वाहत होते. त्यातून बस निघून जाईल, या आत्मविश्वासातून चालक सुरेवार यांनी बस पुलावर टाकली. पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे बस नाल्याच्या दिशेने वळून वाहून जाऊ लागली. पुलापासून पन्नास ते साठ फूट अंतरावर असलेल्या झाडाला ती अडकली.
ही घटना घडत असताना अनेक नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. बसमधील एकजण झाडावर व एकजण बसजवळ स्वतःला वाचवत उभे होते. बस नाल्यात वाहून जात असताना तिथे उभ्या असलेल्या धाडसी युवकांनी नाल्याच्या पाण्यामध्ये जाऊन सुब्रमण्यम सूर्यनारायण शर्मा (रा. आदिलाबाद) व शरद नामदेव फुलमाळे (रा. काटोल, ता. पुसद) या दोन प्रवाशांचे प्राण वाचवले. तर बसवाहक भीमराव नागरीकर, प्रवासी शेख सलीम शे. इब्राहिम, इंदल रामप्रसाद मेहेत्रे (दोघेही रा. पुसद) या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. बसचे चालक सतीश सुरेवार यांचा शोध अजून लागला नाही.
क्रेनच्या साहाय्याने बस काढण्याचे प्रयत्न बचाव पथकाने सुरू केले. मात्र, क्रेनची केबल तुटल्याने बस काढण्यात अडचण निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच प्रशासन पोहोचण्यापूर्वी महागाव तालुक्यातील वाकद येथील अविनाश राठोड या युवकाने एकाचे प्राण वाचविले. तर दुसऱ्याला मारोती चिंचे, पांडुरंग शिंदे, नगरसेवक संदीप ठाकरे यांनी वाचविले.
घटनेची गंभीरता पाहता आमदार नामदेव ससाणे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार आनंद देऊळगावकर, ठाणेदार अमोल माळवे आदी अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी ठाण मांडून होते. खासदार हेमंत पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
आमदार उतरले पुराच्या पाण्यात
पुरात बस वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आमदार नामदेव ससाणे दाखल झालेत. त्यांनी पाण्यातून दोन प्रवाशांना बाहेर काढून प्राण वाचविणाऱ्या युवकांची पाठ थोपटली. बसमध्ये अजून काही जण अडकून असल्याचे समजताच ते त्या युवकासमवेत पुराच्या पाण्यात उतरले. त्यानंतर बसमधील एकाला बाहेर काढण्यास मदत केली.
दहागाव नाल्यावरील पुलाला कठडे नसल्याने पुराचा अंदाज चालकाला येऊ शकला नाही. घडलेली घटना अत्यंत दुदैवी आहे. या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळविली आहे.- हेमंत पाटील, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.