चंद्रपूर : लहान बालकांना शाळेची ओढ लागावी, चांगला आहार मिळावा यासाठी अंगणवाड्यांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. याअंतर्गत तांदूळ, गहू, मिरची पावडर, हळद, मूगदाळ, साखर दिल्या जाते. मात्र, या साहित्यात भेसळ करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच नागभीड येथे हा प्रकार उजेडात आला. पोषण आहाराच्या अनुशंगाने अनेकांच्या तक्रारीही येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने विरोधीगट नेते डॅा. सतीश वारजूकर यांनी प्लॅस्टिक मिश्रीत तांदूळ पुरावाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मित्ताली सेठी यांच्यापुढे सादर केला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत दोन हजार 565 मोठ्या अंगणवाड्या, तर 119 मिनी अंगणवाड्या आहेत. महिला व बालविकास मंत्रालयामार्फेत अंगणवाडीतील बालके आणि गरोदर, स्तनदा मातांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो.त्यात तांदूळ, गहू, मिरची पावडर, हळद, मूगदाळ आणि साखरेचा समावेश आहे.
अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळात प्लॅास्टिक असल्याचे दिसून आले. डाळ, तिखट, हळद, चना आणि डाळीचाही भेसळयुक्त पुरवठा करण्यात येत आहे.नागभीड, ब्रह्मपुरी, वरोरा, गोंडपिंपरी, कोरपना यासह काही तालुक्यांत भेसळयुक्त साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानेजिल्हा परिषदेच्या काही सदस्यांकडे तक्रारी येत आहे.
तक्रारींच्या अनुशंगाने जिल्हा परिषदेचे गटनेते यांनी शंकरपूर येथील अंगणवाडीतील पोषण आहाराची पाहणी केली. या पाहणीत त्यांना तांदूळ प्लॅास्टिक मिश्रित दिसून आला. हाच प्लास्टिकमिश्रित तांदूळ त्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मित्ताली सेठी यांच्यापुढे सादर केला. त्यांनी याबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
"तांदळाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल एक-दोन दिवसांत येईल. तो आल्यावरच कळेल."
- डॅा. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर
"गरोदर माता, अंगणवाडीतील मुलांच्या आरोग्याशी हा खेळ आहे. महिला व बालकल्याण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पुरवठाधारकांवर योग्य ती कारवाई न केल्यास जिल्हा परिषदेसमोरच आंदोलन करण्यात येईल."
- डॅा. सतीश वारजूकर, गटनेते काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.