Narendra Modi sakal
विदर्भ

Narendra Modi : काँग्रेससोबत असलेली शिवसेना नकली; चंद्रपुरातून फोडला प्रचाराचा नारळ

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ मोदी यांची चंद्रपुरात जाहीर सभा झाली.

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर - ‘जनसमर्थन गमावूनही काँग्रेसमध्ये काही बदल झालेला नाही. आताही देशात फूट पाडून सत्ता मिळविण्याचे या पक्षाचे धोरण आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची विभाजनवादी भाषा दिसून येते,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना धारेवर धरले.

राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारवर कमिशनखोरीचा आरोप करताना सध्या काँग्रेससोबत असलेली शिवसेना नकली असल्याची टीका त्यांनी केली. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी करत असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ मोदी यांची आज चंद्रपुरात जाहीर सभा झाली. यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘सनातन धर्मावर टीका करणारे इंडिया आघाडीत आहेत. त्यांना आता दक्षिण भारत वेगळा करायचा आहे. त्यामुळे विभाजनवादी इंडिया आघाडी हद्दपार करण्याची वेळ आली आहे,’ असे पंतप्रधान म्हणाले.

‘देशासमोरील साऱ्या समस्यांची जननी काँग्रेस आहे. काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन केले. काश्मीर समस्या, नक्षलवादासोबतच दहशतवादाला संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. राममंदिर होऊ नये म्हणून आडकाठी आणणारी काँग्रेसच होती. प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. काँग्रेसच्या वकिलांनीच त्यासाठी न्यायालयात धाव घेतली. एवढेच नव्हे तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार टाकला,’ असे ते म्हणाले.

सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा आढावाही पंतप्रधानांनी यावेळी घेतला. ‘‘स्थिर सरकारमुळे देशातील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाला. नक्षलवाद कमकुवत झाला. गडचिरोली जिल्हा आता विकासासाठी ओळखला जातो. मोदी सरकार गरिबांचे सरकार आहे. मी शाही परिवारातून आलो नाही. त्यामुळे मला गरिबांच्या समस्यांची जाण आहे.

दलित, आदिवासींच्या वस्त्यांमध्ये आधी पिण्यासाठी पाणी नव्हते. ते आता पोचले आहे. पंतप्रधान आवास योजनेतून पाच कोटी लोकांना घरे दिली, दहा कोटी महिलांना उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर दिले. देशातील ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देत आहोत, ११ कोटी शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळत आहे.

या योजनांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात वंचित, आदिवासी, दलित समाजातील आहेत. हा बदल मोदींमुळे झालेला नाही तर तुमच्या एका मताने, तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने झाला आहे,’ असे मोदी म्हणाले. नकली शिवसेना असा उल्लेख करीत उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी बोचरी टीका केली.

‘आघाडी’चा विकास कामांना विरोध

‘सत्तेतून पैसा आणि कमिशनखोरी करण्यासाठीच इंडिया आघाडी झाली आहे. जनादेशाचा अपमान करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. तेव्हा राज्याची प्रगती थांबली. आघाडीतील नेत्यांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला. त्या सरकारने केवळ कमिशनसाठी जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्गाला, गरिबांना घरे, मुंबईतील मेट्रो या योजनांना विरोध केला,’ अशीही टीका मोदी यांनी केली.

सभेला व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. आमदार बंटी भांगडिया, आमदार संदीप धुर्वे, माजी आमदार शोभाताई फडणवीस आदी उपस्थित होते.

काँग्रेस हे कडू कारले

काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले, ‘कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरीही कडूच राहते ही म्हण काँग्रेसला तंतोतंत लागू पडते. देशातील सर्व समस्यांचे मूळ काँग्रेसच्या धोरणांमध्ये असल्यामुळेच या पक्षाने जनाधार गमावला.’ महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रकल्पांमध्ये काँग्रेसने खोडा घातल्याचा आरोपही त्यांनी केला.

क्षणचित्रे

  • महाकालीच्या पावनभूमीतून मी आदिशक्तीला नमन करतो, असे मराठीतून सांगत मोदी यांनी भाषणाला प्रारंभ केला.

  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो असे सांगून चंद्रपूरकरांना माझा नमस्कार, असेही मोदी मराठीत म्हणाले.

  • राममंदिर आणि संसदेच्या नव्या इमारतीसाठी सागवानी लाकडे पाठविल्यामुळे चंद्रपूरची ख्याती देशभर पोचली

  • गडचिरोलीमधील नक्षलवाद कमी होऊन या जिल्ह्याची आता पोलादाचा जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

  • काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफीनामा द्यायला हवा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • विरोधी पक्षाकडे ना झेंडा आहे ना अजेंडा, असेही शिंदे म्हणाले.

  • चंद्रपूर-गडचिरोलीचे यान थेट संसदेत उतरेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • देशीसाठी नव्हे तर देशासाठी मतदान करा, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना केले.

  • रामदास आठवले यांच्या चारोळ्यांनी उपस्थितांचे मनोरंजन.

  • मोदींनी ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांना जवळ बोलावून विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT