अमरावती : वर्धा जिल्ह्याचा निरोप घेऊन शुक्रवारीच अमरावती गाठले. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या जिल्ह्याविषयी खूप आकर्षण होते. पहिलाच दिवस असल्याने परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांचा दौरा करण्याचे ठरले. सकाळचे अचलपूर तालुका प्रतिनिधी प्रकाश गुळसुंदरे यांनी रिसिव्ह केले. अचलपूर येथे फेरफटका मारत असताना नाश्ता करण्यासाठी देवडी येथील श्री टॉकीजजवळ बरबटीचे भजे खाण्यासाठी आलो. तेथे खवय्यांची गर्दी होती. नामदेवराव यांची भजी प्रसिद्ध असल्याचे समजले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा भजी विक्रीचा व्यवसाय करतो, मात्र भज्यांची चव तीच. तेथे उपस्थित सामाजिक कार्यकर्ते श्रीधर क्षीरसागर यांनी जिल्हानिर्मितीची समस्या बोलून दाखवली.
अचलपूर जिल्हा झालाच पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. जुळ्या शहरांचा विकास, शेतकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षणाची सोय होऊन रोजगार मिळू शकतो, असे ते म्हणाले. त्यावर अजहर शेख म्हणाले, अचलपूर के विकास के लिए जिल्हा बनना बहूत जरुरी हैं. पुढे परतवाडा जयस्तंभ चौकात प्रहार पदाधिकारी विजय थावानी यांची भेट झाली. अचलपूर जिल्हा तर होणे गरजेचे आहेच, पण त्यापेक्षा अचलपुरात शिक्षण व आरोग्याच्या मूलभूत सुविधाही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक गोवर्धन मेहरे यांनी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात असून, अचलपूर जिल्हा झाला तर अतिक्रमणसारखे अनेक प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते विजय मांडळे यांनी आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी अचलपूर जिल्हा तातडीने गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर दुरानी चौकात गोपाल हॉटेलमध्ये लस्सीचा आस्वाद घेतला. लस्सीची चव बराच वेळ जिभेवर होती. दुकानाबाहेर निघताना गजानन घोगे, राजा पिंजरकर, राजू वसू, सुमित घोगे बोलू लागले. तालुक्याच्या विकासासोबतच उद्योगाधंदे वाढून रोजगार उपलब्ध होऊ शकतात. याकरिता अचलपूर जिल्हा होणे गरजेचे आहे. बोलता-बोलता पुढे असलेल्या ज्योती पान सेंटरकडे नजर गेली. तिथे शेतकरी प्रीतम लांडे, दिनेश काळे यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. त्यांनीही जिल्हा झाल्यास अनेक समस्या सुटतील, हाच पाढा गिरवला.
तेथून पुढे जात नाही तोच भाजपचे पदाधिकारी रूपेश लहाने भेटले. अचलपूर जिल्ह्याची खरच खूप गरज आहे. अचलपूर मतदारसंघाचे आमदार व राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष द्यावे, अशी भावना व्यक्त केली. तर पंचायत समिती सदस्य सुनील तायडे, आशीष जावरकर यांनी विकासासाठी तसेच मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी अचलपूर जिल्हा व्हावा, असे सांगितले. त्यानंतर पुढे येताच पुन्हा खवैय्यांची गर्दी दिसली. ती चौपाटीवरील पाणीपुरीच्या गाडीवर. आम्हीही पाणीपुरी खाल्ली. बापरे.. भारी तिखट.. नाकातोंडातून पाणी आले. नंतर त्यांनी थोडी खटाई टाकून पाणी मिक्स करून दिलं. त्यामुळे पाण्याचा तिखटपणा कमी झाला. पाणीपुरी खूपच चविष्ट होती. पाणीपुरी खाल्ल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो.
अचलपूर अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले एक महत्त्वाचे तालुक्याचे शहर. अचलपूरशिवाय वऱ्हाडचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही, असे या शहराबाबत म्हटले जाते. जैनधर्मीय इल राजामुळे एलिचपूर असे नाव पडले व काळाच्या ओघात त्याचे अचलपूर झाले. काही काळ विदर्भाची राजधानी असलेले हे शहर बिच्छन नदीतीरावर एका भुईकोटाच्या आत वसलेले असून, मध्ययुगीन काळात वऱ्हाडातील महत्त्वाचे ठिकाण होते. येथील वास्तू आजही आपल्या मध्ययुगीन काळातील गत वैभवाची साक्ष देत आहेत. तालुक्यात संत्रा, कपाशी या दोन पिकांसह अन्य पिके घेतली जातात. लागूनच विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटमध्ये वनसंपदा भरभरून आहे.
१९८५ पासून अचलपूर जिल्हानिर्मितीची मागणी होत आहे. लोकनेते कॉ. सुदाम काका देशमुख यांच्यासह तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रा. सु. गवई यांच्यासह अनेकांनी अचलपूर जिल्ह्याची मागणी शासनदरबारी लावून धरली. माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांनी राज्यातील युती शासनाच्या काळात अचलपूर जिल्ह्याच्या प्रश्नावर उपोषण केल्याने हा मुद्दा सदनात चर्चिला गेला. तत्कालीन आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांनी सभागृहात याला औचित्याचा मुद्दा करत वसुधाताईंचे उपोषण व जिल्ह्याच्या मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूरबाजार तालुक्यातील श्रीक्षेत्र नागरवाडी येथे २२ डिसेंबर २००८ पासून तब्बल १३ दिवस अन्नत्याग आंदोलन केले. तसेच शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला.
अनेक संघटनांनी जिल्ह्याची मागणी लावून धरली व आंदोलन केले. या मागणीचा पाठपुरावा करीत हा विषय सातत्याने सर्वांनी चर्चेत ठेवल्याचे फलित म्हणून राज्यातील प्रस्तावित जिल्ह्यांच्या यादीत अचलपूरचे नाव आले. अचलपूर जिल्हा निर्मितीसोबतच चांदूरबाजार तालुक्याचे विभाजन करून पूर्णामायच्या काठावरील परतवाडा-अमरावती मार्गावरील आसेगाव तर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्याच्या विभाजनातून चुर्णी या दोन नवीन तालुक्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.
उपोषण केले, तरी जिल्हा नाही
मेळघाटच्या ग्रामस्थांना जिल्हा ठिकाणी जायचे असल्यास त्यांची गैरसोय होते. अचलपूर जिल्ह्याच्या मागणीकरिता विधान भवनामध्ये मी स्वतः उपोषणाला बसले होते. त्यावेळी सभापतीने आश्वासन दिले होते की, इतर जिल्हे होतील त्यावेळी निश्चितपणे अचलपूर जिल्ह्याचा विचार केला जाईल. मात्र त्यानंतर काही जिल्हे झाले; पण अचलपूर जिल्हा झाला नाही. अचलपूरच्या विकासासोबतच इतर तालुक्यांच्या विकासाकरिता तसेच नागरिकांच्या सोयीकरिता आतातरी अचलपूर जिल्ह्याचा विचार व्हावा.
- वसुधा देशमुख,
माजीमंत्री
जिल्हा निर्मिती आवश्यकच
अचलपूर जिल्हा झाल्यास चुर्णी तालुका होणार असून, मेळघाटातील आदिवासी बांधवांना सोयीचे होणार आहे. विकासासोबत सर्वांचीच गैरसोय टळणार असल्याने अचलपूर जिल्हा होणे आवश्यक आहे.
- राजकुमार पटेल,
आमदार, मेळघाट
मेळघाटातील नागरिकांना होईल सोयीचे
मेळघाट मतदारसंघातील नागरिकांना जिल्हा कार्यालय दूर पडते. अचलपूर जिल्हा झाला तर व्याघ्रप्रकल्पासोबत इतरही कार्यालये अचलपुरात येतील. आरोग्ययंत्रणा आणखी सक्षम होईल. विकासासोबतच मेळघाटातील नागरिकांना सोयीचे होईल. मी आमदार असताना अचलपूर आदिवासी जिल्हा व्हावा, यासंदर्भात मेळघाटातील अनेक ग्रामपंचायतींनी ठराव दिले आहेत.
- केवलराम काळे,
माजी आमदार, मेळघाट
विकासाच्या दृष्टीने व्हावा जिल्हा
अचलपूर जिल्हा करण्याकरिता सर्वच आवश्यक पोटेन्शियल असून, महसुलाला लागणारी जागाही येथे उपलब्ध आहे. भौगोलिक, सामाजिक, राजकीय व आरोग्यासंबंधित व्यवस्था आहे. जिल्हा करण्याकरिता असलेले निकष अचलपूर पूर्ण करतो. विकासाच्या दृष्टीने तसेच झटपट विकास व्हावा, याकरिता अचलपूर जिल्हा होणे गरजेचे आहे.
- गजानन कोल्हे,
प्रदेश उपाध्यक्ष, ओबीसी मोर्चा, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.