अहेरी (जि. गडचिरोली) : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायतीअंतर्गत पुसुकपल्ली येथे मूत्रपिंडाच्या आजाराने हाहाकार माजविला आहे. येथील अनेक नागरिक मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असून आजवर 7 रुग्णांचा याच आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शिवाय मूत्रपिंडाच्या आजाराचे महागडे उपचार करण्यासाठी त्यांना गडचिरोली, चंद्रपूर किंवा नागपूरसारख्या महानगरात जावे लागते. येथील गरीब नागरिकांना हे उपचार परवडणारे नसून ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पुसूकपल्ली येथे मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या सात असली; तरी यापूर्वी फारशा नोंदी झाल्या नसल्याने ही संख्या याहून मोठी असण्याची शक्यता आहे. गावातील नागरिक गरीब असल्याने त्यांच्यापर्यंत आरोग्यसेवा पोहोचत नाही. अनेकदा निदान न झाल्याने व योग्य उपचार न मिळाल्यानेही मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे बाधितांचा नेमका आकडा सांगणे कठीण आहे.
विशेष म्हणजे, अजून 4 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चंद्रपूर, नागपूर, सेवाग्रामसारख्या ठिकाणी गावकऱ्यांना उपचाराला जाणे नित्याचेच झाले आहे. ही समस्या पिण्याच्या दूषित पाण्यामुळे उद्भवत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दूषित पाण्यामुळे केवळ मूत्रपिंडाचेच आजार नव्हे, तर कावीळ, अतिसार व इतर जलजन्य आजारांचे रुग्णदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 5 ते 6 वर्षांपूर्वी गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथसुद्धा आली होती, असे गावकरी सांगतात.
तालुक्यातील उमानूर व त्या परिसरातील गावातसुद्धा मूत्रपिंडाच्या आजाराचे रुग्ण सतत आढळत असल्याने तेथील गावकरीसुद्धा दूषित पाण्याचेच कारण सांगत आहेत. अहेरी तालुक्यातल्या बहुतांश भागांत पेयजलाची समस्या असून अशुद्ध पाण्यावर जनता तहान भागवताना दिसते. यासंदर्भात गडचिरोलीच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रशांत गोलंगे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
गावातील अनेक आजारी रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे गावकरी चिंतित आहेत. मूत्रपिंडाच्या आजाराचा महागडा उपचार करण्याची ऐपत गावकऱ्यांची नाही. त्यामुळे उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रशासनाला वारंवार कळवूनही या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोयर यांनी दिली.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.