लाखनी (जि. भंडारा) : शहराला स्वच्छ, सुंदर करणे व नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची नैतिक जबाबदारी स्थानिक नेत्यांची आहे. परंतु, या जबाबदारीचे भान लाखनीतील नेत्यांना नसल्याचेच येथील स्थितीवरून दिसते. कारभारी मंडळींना विकासाची परिभाषाच न कळल्याने शहरात विकासकामांच्या बाबतीत ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी स्थिती आहे. विकासाची दृष्टी असणारी नेतेमंडळी सत्तेत नसल्याने गत पाच वर्षांत शहराचे वाटोळे झाले. पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन चक्क नाल्यांमधून टाकली आहे. त्यातच धक्कादायक म्हणजे गटारांच्या झाकणांवर नळ आहेत. येथील पाणी प्यायचे कसे, असा प्रश्न स्थानिकांना पडतो.
नळाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचे कसलेही शुद्धीकरण होत नाही. बोरवेलचे पाणी थेट टाकीत भरून तेच नागरिकांना पुरविले जाते. रस्ते, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. उड्डाणपुलाचे काम रखडल्याने दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. मंजुरीनंतर तब्बल चार वर्षांनी उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. दोन वर्षांपासून मुंबईच्या जेएमसी कंपनीमार्फत उड्डाणपुलाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू आहे. सर्विस रोडवर अतिक्रमण वाढले. तहसील कार्यालयापासून सिंधीलाईन चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला आठवडी बाजार भरत असल्याने सारा गोंधळात गोंधळ असतो. ऑक्टोबर २०२० मध्ये नगरपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. मात्र दहा महिने लोटून नियमित अधिकारी मिळालेला नाही. नियोजनबद्ध विकासातून लाखनीचा विकास व्हावा, एवढीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे.
सकाळची वेळ असल्याने सर्वत्र धावपळ होती. परिसरातील माता-भगिनी सार्वजनिक नळाचे पाणी भरत होत्या. धक्कादायक म्हणजे नगरपंचायतीने लावलेले पिण्याच्या पाण्याचे नळ चक्क नालीवर आहेत. पिण्याच्या पाण्याचे नळ नालीवर लावणारे राज्यात बहुतेक लाखनी हे एकमेव उदाहरण असावे. यात आणखी गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याची संपूर्ण पाइपलाइन नालीतूनच टाकण्यात आली. स्थानिक नगरपंचायतीने केलेले हे काम अत्यंत चिड आणणारे आहे. ग्रामीण भागाचे शहरीकरण करण्यासाठी नगरपंचायतीची स्थापना केली जाते.
रस्त्यांची कामे सुमार, गटाराचे पाणी घरात
१७ वॉर्डसंख्या असलेल्या लाखनी शहरात केवळ बोटावर मोजण्याइतपत रस्त्यांची कामे झाली आहेत. त्यातही कामाचा दर्जा अतिशय सुमार आहे. बांधण्यात आलेले रस्ते भविष्याची गरज लक्षात न घेता पारंपरिक पद्धतीने बांधले आहेत. जुन्याच जागेवर केवळ सिमेंट रस्ता बांधून लोकांची बोळवण करण्यात आली. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचा प्रश्न गंभीर आहे. तुटलेल्या नाल्यांची थातूरमातूर दुरुस्ती करून वरून सिमेंट-काॅंक्रिटची झाकणं बसवलेली आहे. यामुळे नाल्या पूर्णतः बंद झाल्या व त्यातील गाळ उपसण्यासाठी वावच नाही. परिणामी पावसाळ्यात तुंबलेल्या नाल्यांमुळे लोकांच्या घरात पाणी शिरते.
नळाद्वारे अशुद्ध पाणीपुरवठा
नगरपंचायतीच्या विद्वान कारभाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय तर केली; परंतु नळाची पाइपलाइन घाण वाहून नेणाऱ्या नाल्यांमधून टाकली. त्यामुळे पाच वर्षे लोटूनही वॉर्डांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यात नगरपंचायत अयशस्वी ठरली. काही ठिकाणी पाइपलाइन आहे तर नळं नाहीत, कुठे नळं पोहोचले तर तोट्या नाहीत, अशी स्थिती आहे. केवळ पाच टाक्यांच्या साहाय्याने १५ हजार लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे नागरिकांना नळाद्वारे पुरविले जाणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरणच होत नाही. टाकीजवळील बोअरवेलचे पाणी थेट टाकीत चढवून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाते.
लाखनी शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी, नाल्यांमध्ये सुधारणा करावी लागेल. आजही काही वॉर्डात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. घनकचरा व्यवस्थापन अद्यावत करणे आवश्यक आहे. माजी नगराध्यक्ष ज्योती निखाडे यांनी ज्या कामातून जास्त पैसा कमवता येईल अशाच कामांना प्राधान्य दिले. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या किडीने लाखनीच्या विकासाला पोखरून काढले. त्यामुळेच स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यात नगर पंचायत अपयशी ठरली. स्मशानघाटाचे सौंदर्यीकरण दोन वर्षांपासून थंडबस्त्यात आहे. याची चौकशी करणे आवश्यक आहे.- धनू व्यास, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
शहराचा विकास करण्यासाठी योग्य नियोजनातून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आज शहरात चांगले गुणवत्तापूर्ण रस्ते व झाकणबंद नाल्या, गरजूंना घरकुलांचा पुरवठा, शहर सौंदर्यीकरणासोबतच प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या तरच आपले शहर स्वच्छ, समृद्ध होईल. यासाठी विविध शासकीय योजना शहरासाठी खेचून आणणे आवश्यक आहे. होतकरू तरुण, शिक्षित, सुजाण नागरिकांचा सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग आवश्यक आहे.- ॲड. कोमल गभणे, जिल्हाध्यक्ष, भाजप, ओबीसी मोर्चा भंडारा, माजी नगरसेवक लाखनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.