गडचिरोली : गडचिरोली पोलिस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षलविरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी पोलिस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भामरागड (जि. गडचिरोली) तालुक्यातील धोडराज येथे पोलिस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व जनजागरण मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी येथील आदिवासी आणि पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पोलिस महासंचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुर्गम भागात भेटी दिल्या. विकासाचे काम आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत असून रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गत दोन वर्षांत सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलिस महत्त्वाचा घटक असून पोलिसांच्या पाठीमागे राज्य सरकार भक्कमपणे उभे आहे. तसेच आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम याबाबत सरकारने नियोजन केले आहे. गडचिरोलीत पूर्वीच्या तुलनेत आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पोलिस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे दिवाळी साजरी करणे पोलिसांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. प्रास्ताविक पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला वीर बिरसा मुंडा आणि वीर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
सरकार बरखास्तीची मागणी हास्यास्पद
नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि आमच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा आकडा वाढल्याने विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळेच ते विरोधात बोलत असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राज्य सरकार बरखास्तीची मागणी हास्यास्पद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले, की आज आमचे बहुमत आहे. त्यामुळे सरकार बरखास्त कशासाठी करायचे. तीन महिन्यांत आमच्या सरकारने राज्याच्या हिताचे ७२ मोठे निर्णय घेतले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने ३९७ तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने २४३ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत.
शहरी नक्षलावादाचाही बीमोड करणार
पालकमंत्री असताना मी दरवर्षी गडचिरोली पोलिसांसोबत दिवाळी साजरी करत होतो. आता मुख्यमंत्री आहे. मी जे सुरू केले तेच कायम ठेवतो, याचा आनंद आहे. अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढावे याकरिता त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो. नक्षलवाद कमी होत चालला असून गडचिरोलीचा विकास होते आहे. नवे उद्योग सुरु होत आहे. आता शहरी नक्षलवादाचा बीमोड करायचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करायला सांगितले आहे. निकषांमध्ये बसवून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. हे बळीराजाचे सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.