जळगाव जामोद ः सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर (ता.१०) सायंकाळी करण्यात आली. रामदास महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भेंडवळ गावाशेजारील एका शेतात घट मांडणी केली असून उद्या ११ मे रोजी सकाळी ५.३० वाजता त्या घट मांडनीत झालेल्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तवणार आहेत.
पीक परिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी भेंडवळची घटमांडणीबद्दल विदर्भातील सर्वसामान्य लोकांना देखिल उत्सुकता असते. पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या बुलडणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते.
चंद्रभान महाराजांनी सुरू केलेली भेंडवळची घट मांडणी आजही त्यांच्या वंशजानी सुरू ठेवली आहे. आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर (ता.१०) सायंकाळी पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी गावाबाहेरील एका शेतात घट मागणी केली. शेतात सुमारे सात फुट व्यासाचा गोलाकार घट तयार करण्यात आला. घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची चार ढेकळे ठेवण्यात आली. ही ठेवण्यात आलेली चार ढेकळे पावसाच्या चार महिन्यांचे प्रतीक मानण्यात येतात. त्यावर पाण्याने भरलेला करवा अर्थात मातीचे भांडे ठेवून त्या करव्यावर वडा, भजे, करंजी, पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, पानविडा, सुपारी आदी ठेवण्यात आले. तसेच गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडई यासह १८ प्रकारच्या धान्याची व खाद्य पदार्थांची प्रतीकात्मक मांडणी करण्यात आली.
घटामध्ये ठेवलेली अंबाडी हे दैवत मानले जाते तर मसूर शत्रूचे प्रतीक आणि करडई संरक्षण व्यवस्था, सुपारी राजाचे, पानविडा राजाच्या गादीचे, पुरी पृथ्वीचे, सांडोळी-कुरडई चारा-पाण्याचे आणि करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. सायंकाळी घटमांडणी झाल्यानंतर सर्वजण शेतातून बाहेर निघून गेले व रात्रभर कोणीही शेतात जात नाही. दरम्यान ११ मे रोजी सकाळी ५.३० वाजता पहाटे यात झालेल्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज येत्या वर्षभरातील हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था आणि राजकीय घडामोडींबाबत भाकीत वर्तविणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.