अहेरी (जि. गडचिरोली) : जगभरात कोरोना वॉरियर्सचा नानाप्रकारे सत्कार होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे सारथ्य करत कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कंत्राटी वाहनचालकांना मात्र मागील दहा महिन्यांपासून त्यांच्या हक्काचे पैसेही देण्यात आले नाहीत. मागील दहा महिन्यांपासून एक फुटकी कवडी मिळाली नसतानादेखील हे कोरोनायोद्ध रात्रंदिवस आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांवर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून मानधन तत्त्वावर चालक नियुक्त करण्यात आले. रुग्णवाहिका असल्याने अहोरात्र सेवा देण्याचे बंधन त्यांच्यावर टाकण्यात आले. त्यानुसार हे वाहनचालक जिवावर उदार होऊन काम करत आहेत. मात्र, जिल्ह्यातील या एकूण 45 रुग्णवाहिका चालकांना तब्बल 10 महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही.
मागील चार महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्यावर कामाचा ताण अतोनात वाढला तेव्हा मानधन मिळाल्याशिवाय रुग्णवाहिकेला हात लावायचा नाही, असा विचार काहींच्या मनात आला होता. परंतु अशा नाजूक परिस्थितीत असहकार योग्य नाही, असा समाजहिताचा विचार करून हे कोरोनायोद्धे कार्यरत आहेत. त्यांची उपेक्षा इथेच संपली नसून त्यांना अपरात्री कुठेही पाठविणे, कोरोना संशयितांना उचलून विलगीकरण कक्षात सोडणे ही कामे सांगण्यात येत होती.
शिवाय या संशयितांमध्ये काही कोरोना पॉझिटिव्ह असण्याची दाट शक्यता असल्याने या वाहनचालकांनाही संसर्गाचा धोका आहे. जीपसदृश्य या रुग्णवाहिकेत केवळ हातमोजे व मास्क एवढीच तोकडी सुरक्षा साधने आहेत. या साधनांसह संशयितांना घेऊन प्रवास करणे फार जोखमीचे आहे तरीही उपाशीपोटी हे आव्हान लीलया पेलणाऱ्या या कोरोना वॉरियर्सचे मानधन वाढविण्याचे, तर सोडाच किमान आहे ते मानधनसुद्धा अद्याप देण्यात आले नाही.
त्यामुळे हे वाहनचालक अनेक आर्थिक समस्यांचा सामना करत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचे थकीत मानधन तत्काळ देण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांना विचारणा केली असता वरिष्ठस्तरावरून अद्याप मानधन आले नाही. ते येताच मानधन देऊ, असे त्यांनी सांगितले.
विविध आस्थापनांमध्ये विविध पदांवर काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्या संघटना असतात. त्यांच्यावर अन्याय झाल्यास या संघटना आवाज उचलतात. पण, या कंत्राटी वाहनचालकांची संघटनासुद्धा नाही. याबद्दल त्यांना कुणी फारसे मार्गदर्शनही केले नाही. ही समस्या सोडवायला सक्षम नेतृत्व किंवा संघटनेची सोबत नसल्याने ते हा अन्याय निमूटपणे सहन करीत आहेत.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.