चंद्रपूर : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही चंद्रपूर शहर कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. त्यामुळे सर्व शासकीय कोविड रुग्णालये रुग्णांनी भरले आहेत. खासगी रुग्णालयाचीही स्थिती अशीच आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. कोरोना दुस-या लाटेने जिल्ह्यात कहर केला आहे. दिवसागणिक नवीन पाचशे ते सहाशे रुग्णांची भर पडत आहे. सर्व शासकीय रुग्णालये फुल्ल आहेत. यामुळे एक रुग्णाला अक्षरशः रुग्णालयासमोरील फुटपाथवर तब्बल ९ तासांपर्यंत झोपण्याची वेळ आलीये.
चंद्रपुरातील समाधी वॉर्डातील एक रुग्ण दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. मनपा कर्मचा-यांनी बेड नसल्याने घरीच उपचार करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी वनराजीक महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मोठ्या धावपळीनंतर बेडची व्यवस्था झाली. प्रकृती गंभीर झाल्याने ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तेथे ऑक्सिजन मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा वनराजीक महाविद्यालयात नेले. मात्र, या सर्व प्रक्रियेत उपचार घेत असलेला बेड अन्य रुग्णाला देण्यात आला. त्यामुळे तेथील कर्मचा-यांनी या रुग्णाला जमिनीवर ठेवले. बेड आणि उपचाराच्या प्रतीक्षेत तो कोरोनाशी दोन हात करीत आहे.
रमेश स्वान हा ७५ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले. मात्र, शासकीय रुग्णालयात एकही बेड शिल्लक नसल्याने प्रकृती चांगली असल्यास घरीच उपचार घ्यावा, असा सल्ला दिला. कुटुंबीयांनीही घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी धावपळ करीत वनराजीक महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात नेले.
तेथील प्रशासनाने जुळवाजुळव करून एका बेडची व्यवस्था केली. उपचार सुरू झाला. परंतु, स्वान यांची प्रकृती पुन्हा बिघडू लागली. त्यांना ऑक्सिजन लावणे गरजेचे होते. त्यामुळे या रुग्णाला घेऊन तेथील कर्मचारी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आले. ऑक्सिजनची मागणी केली. परंतु, ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर, या रुग्णाला परत वनराजीक महाविद्यालयात नेण्यात आले. यासर्व प्रक्रियेत उपचार घेत असलेला बेड अन्य दुस-या रुग्णाला देण्यात आला. त्यामुळे आता करायचे काय, असा प्रश्न तेथील कर्मचा-यांना पडला. मात्र, बेड नसल्याने काहीही करणे शक्य नव्हते.
अखेर, या रुग्णाला जमिनीवर ठेवण्यात आले. हा सर्व प्रकाराचा व्हिडिओ या रुग्णाच्या नातेवाइकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर कोविड रुग्णांच्या होणा-या गैरसोयीचा प्रकार पुन्हा उघड झाला. यासंदर्भात रुग्णाचा नातेवाईक हर्षद स्वान याने, प्रशासनाने तातडीने बेड उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करण्यात येत होती.
अखेर ९ तासांच्या संघर्षानंतर आणि त्रासानंतर त्यांना रुग्णालयाकडून बेड उपलब्ध करून देण्यात आला. मात्र या घटनेमुळे रुग्णांच्या प्रकृतीबद्दल प्रशासन किती गंभीर आहे याचाच प्रत्यय आला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.