Even in the shadow of Coronas death Chaitrapalvi continues to flourish Gadchiroli news 
विदर्भ

कोरोनाच्या मृत्यूछायेतही चैत्रपालवीचा तजेला कायम; ऋतुराज वसंताला साद घालत रानोमाळ कोकीळकूजन

मिलिंद उमरे

गडचिरोली : जगभरात मृत्यू वाटत फिरणाऱ्या कोरोनाचा कहर सुरू असताना आणि मानवी विश्‍व या कहराने भयभीत होत असताना कोरोनाच्या या मृत्यूछायेतही निसर्ग क्षणमात्र थबकलेला नाही. निसर्गाला सतत ओरबाडत आपलाच हव्यास जपत जगणारा मानव पुन्हा एकदा लॉकडाउनमुळे घरात बंदिस्त होण्याच्या तयारीत असताना वृक्षांच्या डाहळ्यांच्या फुटव्यातून तजेल हिरवा, पोपटी रंग उधळत चैत्रपालवी नेहमीप्रमाणेच फुलली आहे. किंबहुना सध्या सुरू असलेला निसर्गाविष्कार मानवाला जगण्याची नवी आशा दाखवत आहे.

मराठी नववर्षाचा पहिला महिना म्हणजेच चैत्र मास. या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वत्र गुढीपाडवा आनंदाने साजरा होतो. घराघरांवर सजविलेल्या गुढ्या उभारल्या जात असताना वृक्ष, वेलींच्या अंगोपांगी पानांच्या विविध हिरव्या छटांच्या पताका डुलू लागतात. वसंत ऋतूतला हा महत्त्वाचा महिना असल्याने वसंताची खरी बहार याच महिन्यात बघायला मिळते. एरवी कडवटपणाने भरलेला कडुनिंब मऊ हिरव्यागार पानांनी सजू लागतो. त्याची इवली निळसर पांढरी फुले आपला सुगंध आसमंतात उधळू लागतात.

पारिजातालाही लाजवेल असा या फुलांचा सुगंध छाती भरून घेत कडुनिंबाखाली खाट टाकून त्यावर आरामात पहुडत गर्द पानमळ्यांतून चांदणे पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. याच काळात चैत्रपालवी जागोजागी बघायला मिळते. रानात कुसुंबी कोवळ्या पानांनी कुसुम सजू लागतो, करंज वृक्ष त्याच्याच पायाशी त्याच्या नाजूक पांढऱ्या फुलांची रांगोळी काढू लागतो, आंबा मोहरून आता छोट्या कैऱ्या डोकावू लागलेल्या असतात, एखाद्या अभिसारिकेने आपल्या परडीतील मोत्यांचे सर जमिनीवर सांडत जावे तशी आपली मोतिया रंगाची पिवळसर फुले गाळत मोहवृक्ष निवांत डुलत असतात.

एरवी जांभळाची कधीच पानगळ होत नसली, तरी चैत्रात त्याची नवी पाने चित्त वेधून घेतात, आपल्या लांब पसरट पानांचा पानोळा सांभाळत उभ्या कदंब वृक्षातून चेंडूसारखी फुले, फळे झुलू लागतात, अजूनही अनेक ठिकाणी पळसाने आपली केशरी उधळण जपलेली असते, पांगारा अगोंपांगी फुलून पक्ष्यांना मधुरसाची मेजवानी देत असतो, पर्जन्यवृक्ष शिरीषाच्या अंगांगावर तुर्रेदार पांढऱ्या, गुलाबी फुलांची नक्षी सजू लागते, वडाला तजेलदार पानांचा साज चढतो, पिंपळ नाजूक तपकिरी, लालसर पानांच्या पताका फडकावत बसतो, गुलमोहर, बहावा फुलण्याची तयारी करू लागतात.

चैत्रपालवीच्या या निसर्गमायेतून एकही वृक्ष सुटत नाही. रानातला मोहवृक्ष असो की, शहरातला गुलमोहर असो सगळ्यांवरच चैत्राचे गारूड दिसते. शिवाय या वृक्षराजींवरची नानारंगी, सुरमयी आवाजांच्या पाखरांची मैफल चैत्र अधिकच सौंदर्यवान करते. मराठी नववर्षाचा हा पहिला महिना हिरवाईची, चैतन्याची, अशी अपूर्वाई घेऊन दाखल झाला आहे.

निसर्गाची साद

बदल हाच निसर्गाचा नियम, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून कोरोनाच्या सावटात नैराश्‍यग्रस्त झालेल्या लोकांनी नव्याने नटलेल्या चैत्रपालवीकडे बघायला हवे. शिशिरात पानगळ झालेले उघडेबोडके वृक्ष आपला पर्णसंभार हिरावला म्हणून उदास होत नाहीत. दिवसाचा ताप सहन करीत रात्री आपल्या फांद्यांवर चांदण्या सजवतात. कारण, त्यांना माहिती असतं आता काही दिवसांत चैत्र नवसंजीवनी घेऊन येणार आहे.

मग, हिरव्या, कुसुंबी, लाल, गुलाबी, निळ्या, पिवळ्या, सोनेरी कितीतरी रंगछटा वृक्षराजींवर दिसू लागतील. म्हणून उदासी सोडून भविष्यातील आनंददायी आशेवर दिलखुलास जगण्यासाठी चैत्राच्या रूपात निसर्गच ही नवचैतन्याची साद घालत आहे. गरज आहे फक्त ही साद सजगपणे ऐकण्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT