महागाव (जि. यवतमाळ) : महागाव तालुक्यातील आमणी (खुर्द) येथील पन्नासपेक्षा अधिक महिलांना व लहान बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.२४) रात्री घडली. महाप्रसादाच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित महिलांना व बालकांना तातडीने खासगी दवाखाने, महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आमणी (खुर्द) येथील महिलांना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मळमळ, उलटी, जुलाब, भोवळ व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. काही बालकांतही ही लक्षणे आढळली. म्हणून बाधितांना मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी महागाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
रात्री बहुतांश दवाखाने बंद असल्याने रुग्णांना महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व सवना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दूषित अन्नातून किंवा दूषित पाण्यातून महिलांना व बालकांना विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. त्यानंतर सर्व रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, आज बुधवारी सकाळी उशिरापर्यंत बाधित महिलांसह बालकांवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आज दुसऱ्या दिवशीही सवना ग्रामीण रुग्णालयात बाधित रुग्णांची रांग लागली होती.
त्यात २६ बाधित महिला व बालकांना सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेत. बाधित रुग्णांत संगीता आडेकर, स्वाती शिंदे, कमल बेद्रे, लक्ष्मी चिरंगे, प्रिया बेले,
अश्विनी बेले, प्रणव खोकले, शारदा खोकले, वेदिका खोकले, सुनीता पुंडे, सुनीता भलगे, कुणाल मेतकर, सुनीता वानखेडे, ललिता वाडेकर, महानंदा मोरे, शारदा सरनाटे, सारिका सरनाटे, अश्विनी सरनाटे, मारोती सरनाटे, ताईबाई काळबांडे, सलोनी मोरे, सविता मन्ने, पूजा मन्ने, पद्मिना मन्ने, उषा शिंदे, अनुसया नरवाडे व पुण्यरथा रणमले यांच्यावर उपचार करण्यात आलेत.
विषबाधा झाल्याने पन्नास महिला व लहान बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळताच रुग्णांना रुग्णालयात हलविण्यासाठी शिवसेनेचे भीमराव भालेराव, तालुकाप्रमुख प्रमोद भरवाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे, बाळू पाटील नरवाडे यांनी पुढाकार घेतला.
ग्रामीण रुग्णालयाने दिला माणुसकीचा परिचय
सवना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतिश दुधे यांनी मानवतावादाचा परिचय देत सर्व रुग्णांवर तातडीने उपचार केलेत. दुसऱ्या दिवशीही ते रुग्णांच्या उपचारासाठी झटत होते. अत्यंत अपुरे मनुष्यबळ असतानाही त्यांनी मेहनत घेऊन विषबाधित रुग्णांवर उपचार केले व त्यांचा जीव वाचविला. सर्व रुग्णांना अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट आहे.
मात्र, ती नेमकी कशामुळे झाली, ते सांगता येत नाही. दूषित अन्नामुळे किंवा दूषित पाण्यामुळे विषबाधा होऊ शकते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर सर्व रुग्ण ठणठणीत बरे होतील, असा विश्वास सवना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतिश दुधे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.