विदर्भ

गोसेखुर्द प्रकल्प वरदान नाही, आमच्यासाठी शापच! नागरिकांची खंत

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : कन्हान नदीच्या काठावरील पिपरी, सालेबर्डी, खैरी, संगम ही गावे पूर्णपणे गोसेखुर्द प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात आहेत. १९९४ च्या महापुरात पूरग्रस्त घोषित करून २५ टक्के नागरिकांचे पुनर्वसित वसाहतीत स्थलांतर करण्यात आले. आताही ते लोक तेथेच वास्तव्यास आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या पुरामुळे कन्हान नदीकाठावरील या गावांनी जीव मुठीत घेऊन रात्र काढली. महापुराने ७५ टक्के नागरिकांची घरे पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाल्याने नाइलाजाने त्यांना गाव सोडावे लागले. शेती व घरांचा मोबदला आधीच मिळाल्याने सरकारी मदतीची अपेक्षा करणार तरी कसे? मात्र, उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन असलेली शेती पूर्णपणे बाधित क्षेत्रात (गोसे प्रकल्पात) गेली. उर्वरित शेती व पाळीव जनावरांवर कसेतरी पोट भरत असताना गेल्यावर्षी पुराने गावात ‘दस्तक’ दिल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत. पुनर्वसित गावांत सिमेंटची पक्की घरे दिसतात. परंतु नागरिकांना विचारणा केली असता गोसेखुर्द धरण आमच्यासाठी वरदान नसून शापच ठरले.

आमची गावे नदीकाठावर असल्याने शेती व शेतीपूरक जोडधंदा, मत्स्य व्यवसाय यावर सुरळीत उदरनिर्वाह चालायचा. आम्ही सुखी-समाधानी होतो. परंतु शेती, घरे व शेतातील झाडे प्रकल्पबाधित क्षेत्रात समाविष्ट करून अतिशय अल्प मोबदला देण्यात आला. पुनर्वसित ठिकाणी कुठलेही उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढत आहे. धरणाच्या बॅकवॉटरच्या पाण्यामुळे पावसाळ्यात सतत धाकधूक असते. त्यामुळे घरकर व विजेच्या बिलात सूट मिळावी. विशेष पॅकेज, पुनर्वसित गावाला महसुली दर्जा, वाढीव कुटुंबीयांना कृषी मजुरीचे अनुदान, रोजगाराचे साधन मिळावे अशा येथील नागरिकांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यांचा प्राधान्याने विचार व्हावा, एवढेच.

कन्हान नदीकाठावरील पिपरी गट ग्रामपंचायतीअंतर्गत चिचोली गावाची लोकसंख्या १४९, कुटुंब ३९, शेतकरी ६३, शेतीचे क्षेत्रफळ ७६ हेक्टर आहे. तर कोंढी गट ग्रामपंचायतीअंतर्गत पेवठा येथील लोकसंख्या २४९, कुटुंब ५०, शेतकरी ३२, शेतीचे क्षेत्रफळ ३६ हेक्टर आहे. लोहारा येथील लोकसंख्या ४६०, कुटुंब १०४, शेतकरी ५८, शेतीचे क्षेत्रफळ ६६ हेक्टर आहे. या तिन्ही गावांतील ८५ टक्के शेती गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात आहे. तिन्ही गावांतील शेतकऱ्यांना १५ टक्के शेतीच्या भरोशावर पोट भरावे लागते. ही गावे थोडी उंचावर असल्याने गावांना पुराचा फटका बसत नाही. मात्र, दरवर्षी शेतातील पीक पुरात वाहून जाते. पावसाळा आला की, जुने दिवस आठवून नागरिकांच्या पोटात गोळा उठतो. याउलट याच नदीच्या काठावरील चिचोली, पेेवठा व लोहारा ही गावे उंचावर आहेत.

‘वितभर तुकड्यावर पोट भरायचे कसे?’

गोसेखुर्द धरणामुळे भंडारा व पवनी तालुक्यातील ३४ गावे पूर्णत: बाधित क्षेत्रात आली. त्यापैकी ३२ गावांचे पुनर्वसन झाले. परंतु, भंंडारा शहरालगत वैनगंगा नदीकाठावरील पिंडकेपार, पिंडकेपार टोली व सालेबर्डी (खैरी) या उंचावर असलेल्या दोन गावांचा पुनर्वसनात समावेश आहे. कन्हान नदीकाठावरील व आयुध निर्माणी जवाहरनगरलगत असलेली चिचोली, पेेवठा, लोहारा ही गावे गतवर्षीच्या ऑगस्टमधील महापुरात पाण्याखाली आली. यापूर्वीच्या पुरात शेतीला जेवढा फटका बसला तेवढा गावातील घरांना बसला नव्हता. शिल्लक शेती दरवर्षी पावसाळ्यात पाण्याने वेढली जाते.

३३ वर्षांत ना धरण झाले ना समस्या सुटल्या

नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेवर १९८८ साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचा भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यांच्या १३ तालुक्यांतील ७१८ गावांना लाभ होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पातर्गत ८५ गावठाणे बाधित आहेत. त्यांचे पुनर्वसन ६३ नवीन गावठाणात होणार होते. त्यापैकी ६१ नवीन गावठाणांसाठी सुविधा निर्माण केल्याचे शासन पातळीवरून सांगण्यात येते. दोन गावठाणांची कामे प्रगतिपथावर असल्याचे दर्शविले जाते.

सालेबर्डी, पिपरी, खैरी संगम व पिंडकेपार येथील काही प्रकल्पग्रस्तांना भूखंडाअभावी तात्पुरता निवारा दिला आहे. पुनर्वसित वसाहतीतील नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाजार संकुल व समाज मंदिर या ठिकाणी स्थानांतरित केले आहे. येथे नळाला पाणी येत नाही. सभोवताली कचरा वाढला आहे. यातील मुख्य समस्या ही की, गतवर्षीपासून या ठिकाणी विद्युत पुरवठा नसल्याने नाइलाजाने अंधारात दिवस काढावे लागत आहेत. अंधारात सरपटणारे प्राणी व डासांचा सामना करताना पोट भरावे की आरोग्यावर खर्च करावा, हा प्रश्‍न आहे.
- जितेंद्र गजभिये, उपसरपंच, सालेबर्डी पुनर्वसित ग्रामपंचायत
पिपरी येथील जुन्या वस्तीतील ३० कुटुंबीय व नरसिंहराव क्रीडा संकुलातील ५० कुटुंबीयांची वितभर शेती बाधित क्षेत्रात नाही. त्यांच्या पोट भरण्याचे साधन म्हणून शेती व दुग्ध व्यवसाय असल्याने या कुटुंबीयांना स्थलांतर करण्यास बाध्य करण्यात येऊ नये. लाहोरा, पेवठा व चिचोली या गावकऱ्यांची भावना लक्षात घेता. त्याच्याही पुनर्वसनाचा विचार शासनाने करणे काळाची गरज आहे.
- सुमेध शामकुंवर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, कोंढी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT