मोहाडी (जि. भंडारा) : विज्ञानाने विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती केली आहे. प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञानाने व्यापले आहे. त्यामुळे काळानुसार विवाह पद्धतीतही आमूलाग्र बदल झाला आहे. हायटेक विवाह सोहळ्यामुळे लग्नखर्चात वाढ झाली आहे. अशातच कोरोना संसर्ग व लॉकडाउनमुळे लग्नसमारंभांना मर्यादा आली आहे. लग्नात 50 लोकांना येण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्याकरिता अनेक कागदपत्रे घेऊन कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. मात्र, तालुक्यातील उसर्रा येथे शरणागत कुटुंबातील लग्नाची वरात चक्क बैलबंडीवरून निघाल्याने पुन्हा एकदा पारंपरिक विवाह सोहळ्याचे दर्शन झाले.
या लग्न सोहळ्यात नवरदेवाने स्वतः बैलगाडी हाकत उसर्रा ते सालई खुर्द हा प्रवास केला. परिसरात या वरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे. उसर्रा येथील संतोष शरणागत याचे लग्न 2 जून रोजी सकाळी नऊ वाजता सालई खुर्द येथील वधुशी उत्साहात पार पडले. यात आधुनिक परंपरेला फाटा देत नवरदेव संतोष, त्याचे जावई किशोर भैरम, बहीण किरण भैरम, भाऊ अनिल शरणागत यांनी चक्क बैलबंडी, रेंगीतून वरात काढली. त्यामुळे हा विवाह सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नसोहळ्यात काळानुरूप झालेले बदल, यामुळे लग्नाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र उसर्रा येथील संतोष याचा लग्नसोहळा याला अपवाद ठरला आहे.
बैलबंडी, सनईच्या सुरात जाणारी वरात पाहायला रस्त्याने जाणारे-येणारे क्षणभर थांबत होते. मोबाईलच्या कॅमेरात बैलबंडीची ही वरात प्रत्येकजण टिपून घेत होता. ही वरात जेव्हा उसर्रा येथून सालई खुर्द येथे पोहोचली. तेव्हा सर्वच जण अवाक् झाले. कधी बैलबंडी, रेंगीतून येणारी वरात न बघणाऱ्यांत कुतूहल निर्माण झाले. या वरातीचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे या सोहळ्याची परिसरात चर्चा सुरू होती.
सविस्तर वाचा - नागपुरात नगरसेवक घरीच विलगीकरणात
हा लग्नसोहळा आदर्श ठरला
लग्नासाठी मोठा खर्च केला जातो. महागड्या कार, डेकोरेशन, डीजेच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी, असे चित्र वरातीत दिसते. लॉकडाउनच्या काळात इतर सर्व खर्च टाळून आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करणारे उसर्रा येथील किशोर भैरम व शरणागत मित्र परिवारांनी आयोजित केलेला हा विवाह सोहळा आदर्श ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.