परतवाडा (जि. अमरावती) ः अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक आणि पौराणिक वास्तू गतवैभवाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. त्यात प्रामुख्याने अष्टमासिद्धी येथील विहीर, अचलपूर शहरातील हौजकटोरा, भुलभुलैय्या म्हणजेच दत्तमंदिर आणि शहराच्या भोवती बांधलेला परकोट यासह आदी वास्तूंचा समावेश आहे. या वास्तूंचे जतन करून तो वारसा कायम ठेवण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाची आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अचलपुरातील भुलभुलैय्या म्हणजे दत्त मंदिर. हा वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. सातशे चौरस फूट क्षेत्र म्हणजे दोन मजली वस्तूत तब्बल अकरा मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वांत खाली ज्ञानेश्वर माउलीचे मंदिर तर शेवटच्या टोकाला तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. हे दत्त मंदिर दीडशे वर्षांपूर्वीपासून सुलतानपुरा येथे आहे. या दोन मजली इमारतीला चढण्या आणि उतरण्याकरिता एकच लाकडी खांबावरील जिना आजही सुस्थितीत आहे.
मंदारातील खिडकी व्यवस्था उत्तम असून प्रत्येक मंदिरात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते. चंद्रप्रकाश मंदिरात पोहोचतो. दर्शन घेत पुढे चालत आल्यावर आपण कोणत्याही मूर्तीच्या डोक्यावर येत नाही, हे विशेष. तसेच परतवाडा ते अमरावती मार्गावर असलेल्या अष्टमासिद्धी येथील छोटीशी विहीर पर्यटकांना खुणावते.
लहान मुलांची आंघोळ या विहिरीतील पाण्याने घातली की त्यांची रोगराई दूर होते, असा अनेकांचा विश्वास आहे. या विहिरीवर आंघोळ करणाऱ्यांची गर्दी असते. याच ठिकाणी गोविंद प्रभू यांनी काही लिळा केल्या असल्याचा उल्लेख महानुभाव साहित्यात आढळतो. अचलपूरच्या भोवती असलेल्या परकोट, बुरुज आणि आतील पौराणिक (ताल कटोर) हौजकटोरा इमारत ही वस्तू कलेचा एक नमुना आहे.
नक्की वाचा - ब्रेकअप झालं म्हणून भर रस्त्यात प्रेयसीवर केला चाकूहल्ला; नागरिकांनी केली प्रियकराची बेदम धुलाई
या ऐतिहासिक वास्तू आजही इतिहासाची साक्ष व काळाशी झुंज देत उभ्या आहेत. मात्र पुरातत्त्व विभागाकडून या ऐतिहासिक वस्तूंचे संगोपन पुरेसे होताना दिसत नाही. काही ठिकाणी परकोटाला कुंपण लावले असले तरी अनेक भाग बेवारस असल्यामुळे परकोट, बुरूजसह अनेक ऐतिहासिक वास्तूंची आज पडझड होताना दिसत आहे. यामुळे भविष्यात या ऐतिहासिक वास्तू नामशेष तर होणार नाही ना? अशी भीती नागरिकांसह इतिहासकार तथा वास्तू अभ्यासकांना लागली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.