नागपूर : वक्तशीरपणा, अथक कार्यमग्नता, अफाट जनसंपर्क आणि सतत जागे असणारे सार्वजनिक संकेतांचे स्थान ही साहेबांची वैशिष्ट्ये अगणित प्रसंगातून सांगता येतील. त्यांच्याबरोबरचा प्रत्येक क्षण म्हणजे शिक्षणाची नवी संधी असते, असे गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवार यांच्याबद्दल म्हणाले.
‘एक हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट’ आपण ऐकलीय. ज्यांनी कधीच काही पाहिलं नाही, अशा सात अंधजनांनी हत्तीला स्पर्श केला. त्याने हस्तीदंताला हात लावला, तो म्हणाला हत्ती तर टोकदार भाल्यासारखा आहे. ज्याने कानाला हात लावला, तो म्हणाला हत्ती सुपासारखा आहे. शेपटीला हात लावणारा म्हणाला, हत्ती दोरासारखा आहे. पायाला हात लावणारा म्हणाला, हत्ती खंबीर खांबासारखा आहे. यातल्या प्रत्येकाचे वर्णन अचूक असूनही सरतेशेवटी चूक ठरलं. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना यापेक्षा वेगळं काही होत नाही, असेही ते म्हणाले.
सन १९६७ पासून ते २०२० पर्यंत सलग, अथक ५३ वर्षांची संसदीय कारकीर्द उभ्या महाराष्ट्रात कोणाचीही नाही. सहस्त्रचंद्रदर्शनाचा योग साहेबांच्या जीवनात लवकरच येतो आहे. या अथक, अथांग आणि अपार राजकीय, सार्वजनिक पटाची मांडणी करणे भल्याभल्यांना शक्य नाही. मी १९९२ ला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो होतो. त्याच्याच पुढच्या वर्षी साहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्य मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. हिवाळी अधिवेशनासाठी साहेब नागपुरात आले असताना मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना माझ्या घरी अल्पोपाहारासाठी येण्याचं आमंत्रण दिले.
साहेब म्हणाले ‘उद्या सकाळी सात वाजता येतो’ आम्हां नागपूरकरांसाठी ही वेळ म्हणजे... त्यातही थंडीचे दिवस म्हणजे जरा कठीणच काम होतं! पण मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यावर कोण काय बोलणार? मी नागपूरच्या काही प्रमुख लोकांना सकाळी नाश्त्यासाठी बोलावलं. गंमत म्हणजे मी सकाळी साहेबांना घ्यायला गेलो, तेव्हा ते सातच्याही खूप आधी तयार होऊन माझी वाट पाहत वर्तमानपत्र चाळत बसले होते. बरोबर सातच्या ठोक्याला साहेब माझ्या घरी आले. नागपुरातील एकही जण ठरलेल्या वेळेत पोहोचला नव्हता, असेही ते म्हणले.
साहेब असेच एकदा विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मी त्यांच्यासोबत होतो. सकाळपासूनची गडबड, ठरलेली कामं, भेटीगाठी दुपारी एक वाजता आटोपल्या. जेवणं झाली. त्यानंतर थेट सायंकाळी सहाला यवतमाळला कार्यक्रम होता. विदर्भातली दुपार होती. साहेबांना मी म्हणालो, ‘आता जरा आराम करा. थोड्यावेळानं निघू’ त्यांनी मला उलटा प्रश्न केला. ‘तुला आराम करायचाय का? मी काय बोलणार त्यावर? माझ्या उत्तराची वाट न पाहता ते म्हणाले चल निघू लगेच. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत पुढे जाऊ’. साहेब थकत नाहीत. अथक काम करत राहतात, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
अफाट प्रवास शतकानंतरही थांबू नये
जात, धर्म, पंथ पाहून कधीही सत्ता राबवायची नाही यावर त्यांचा कटाक्ष असतो. २०१९ नंतर गृहमंत्रीपद माझ्याकडं तसं अनपेक्षितपणे आलं. पण या खात्याचा प्रमुख म्हणून काम करताना माझ्यापुढं साहेबांचा आदर्श असतो. अखंड, अथक काम करत राहण्याबाबत तर मला वाटतं, साहेबांना कोणीच हरवू शकत नाही. त्यांच्या एकेका गुणावर पीएच.डी. मिळवता येईल. पण समग्र साहेब मांडायचे तर ग्रंथही अपुरे पडतील. 'लोक माझे सांगाती' घेऊन आयुष्यभर चालत आलेल्या या लोकनेत्याचा अफाट प्रवास शतकानंतरही थांबू नये, अशा माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
- अनिल देशमुख, गृहमंत्री
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.