विदर्भ

सांगा ठाकरे साहेब, येथे कुणाचे उखळ ‘पांढरे’ झाले? प्रकल्प रखडला

प्रा. गणेश राऊत

नेर (जि. यवतमाळ) : आणि बाभूळगाव तालुक्याला सुजलाम्, सुफलाम् करण्याची ताकद असलेला डेहनी प्रकल्प (Dehni Project) उभारायला सुरुवात झाली, तेव्हा शेतकऱ्यांची छाती फुगून छप्पन इंच झाली. आत्महत्यांनी पिळवटून निघालेल्या या जिल्ह्यातील बळीराजा सुखस्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलायला लागला. कोरडवाहू शेतीला पाणी मिळेल. भरघोस उत्पादन होईल, ही भाबडी आशा शेतकऱ्याला होती. परंतु विदर्भातील अनेक प्रकल्पांची जी गत झाली, तीच या प्रकल्पाचीही झाली. पाण्याचा टिपूस शेतकऱ्याला मिळाला नाही. उलट दरवर्षी सिंचनाची आकडेवारी फुगवून फुगवून ‘स्वप्नांचा झुलवा’ सुरू असतो; मात्र प्रकल्पातून पाणी वाहत नाही. प्रकल्पाच्या कामासाठी नियुक्त केलेली कंपनी आर्थिक दिवाळखोरीत निघाली. सिंचनाच्या कामासाठी खरेदी केलेले साहित्य सडले. कोट्यवधी रुपयांचा असा चुराडा झाला. प्रकल्पाचे ‘ऑडिट’ झाले, तर सारेच उजेडात येऊ शकते. परंतु त्यासाठी सिंचन घोटाळा (Irrigation scam) उघडकीस आणणारे जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्यासारखा एखादा छप्पन इंच छातीचा कर्तव्यकठोर अधिकारीच पाहिजे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे (Manikrao Thakre) यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. त्यामुळे या प्रकल्पाविषयी त्यांना सर्वच माहिती असणार. कोट्यवधी खर्च केले. शेतकऱ्यांना चौदा वर्षांपासून झुलवत ठेवले. तरीही प्रकल्पाचा उद्देशच साध्य झाला नाही. मग कुणाचे उखळ ‘पांढरे’ करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला? यातून कुणाचे उखळ ‘पांढरे’ झाले? ठाकरे साहेब, शेतकऱ्यांच्या शंकेचे उत्तर तुम्हीच देऊ शकता. (ignorance from state government to dehni project)

यवतमाळ जिल्ह्यात ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार राजकुमार भितकर यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा करून दौऱ्यासंदर्भात नियोजन केले. ठरल्यानुसार सकाळीच नेर शहरात पोहोचलो. ‘सकाळ’चे नेरचे तालुका बातमीदार गणेश राऊत यांनी रिसिव्ह केले. सोबत स्थानिक बातमीदार योगेश दहेकरसुद्धा होते. शहरातील प्रसिद्ध निमकर टपरी हॉटेलातील आलुबोंड्याचा आस्वाद घेतला. गेल्या चौदा वर्षांपासून डेहनी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरल्याचे समजले. मग काय निघालो आम्ही दुचाकीने माणिकवाडा मार्गाने. उजाड माळरान, बोडखे डोंगर, भकास व बकाल खेडी पाहून आठ किलोमीटर पुढे गेल्यावर माणिकवाडा गाव आले. फकीरजी महाराज यांचे मंदिर नजरेस पडले. गावालगतच्या नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. डेहनी उपसा प्रकल्पाच्या खाणाखुणा दिसू लागल्या. वितरण कुंड व क्लस्टर नजरेत पडत होते. माणिकवाड्याच्या मंदिराजवळ ग्रामस्थांची भेट झाली. त्यांना डेहनी उपसासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, १४ वर्षांपासून आम्ही पाण्याची वाट पाहतोय. पण अजूनही पाणी आमच्या डोळ्यानं दिसलं नाही. आज पाणी येईल, उद्या येईल या आशेवर आम्ही जगत आहोत.

त्यानंतर मांगलादेवी येथे गेलो. बसस्थानकावर गावातील उपसरपंच गणेश बेले, ग्रामपंचायत सदस्य रविपाल गंधे, भरत कुंभारखाने वाट पाहत होते. उपस्थितांनी प्रकल्पाच्या अर्धवट बांधकामाकडे लक्ष वेधले. काही ठिकाणी फुटलेली पाइपलाइन तर कुठे अर्धवट काम, या मंडळींनी दाखविले. आतातरी हा प्रकल्प गतिमान होईल, असा विश्वास नागरिकांना वाटत होता. धनज माणिकवाडा येथून सोबत आलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज नाल्हे, शैलेश हूड, पंकज गोल्हर व मांगलादेवी येथील गावकरी सोबत होते. प्रकल्पाच्या कामातील दोष ही मंडळी वारंवार लक्षात आणून देत होती.

२००७ मध्ये सुरू झाले काम

नेर व बाभूळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प शेतीला पाणी देण्यासाठी अपयशी ठरला. या प्रकल्पात बाभूळगाव तालुक्यातील डेहणी, पहूर, गळवी, दाभा व नेर तालुक्यातील चिखली कान्होबा, सराटा, कुऱ्हेगाव, टेंभी, मंगरूळ, मांगलादेवी, माणिकवाडा, धनज, टाकळी सलामी, ब्राह्मणवाडा, पानझर/मकरामपूर या गावांचा समावेश आहे. यात बाभूळगाव तालुक्यातील २७३१ व नेर तालुक्यातील ४२३७ हेक्टर क्षेत्र ठिंबक सिंचनाने सिंचित होणार आहे. या योजनेच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात फेब्रुवारी २००७ मध्ये करण्यात आली. यात ८० ते १२० हेक्टर क्षेत्राचा एक झोन याप्रमाणे ५७ झोन तयार केले. ते ठिबक सिंचनाद्वारे ओलित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४८०० व दुसऱ्या टप्प्यात १९०० हेक्टर क्षेत्रात ५७ उपवितरण कुंडाची निर्मिती केली आहे.

पाणी पोहोचणे दिवास्वप्नच

ही योजना ऑटोमेशन पद्धतीने काम करणार आहे. पिकांच्या स्थितीनुसार संगणकाद्वारे पाणी देण्याची तरतूद यात आहे. वरवर पाहता एकंदरीत या प्रकल्पाचे संपूर्ण डिझाईन मनाला भुरळ पाडणारे आहे. मागील १४ वर्षांत प्रकल्पाचा रेंगाळलेला कारभार व निकृष्ट दर्जा पाहता शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचणे दिवास्वप्नच ठरले आहे. वापरण्यात आलेले पाइप निकृष्ट दर्जाचे असल्याने ते जागोजागी फुटले आहेत. त्यामुळे शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. अनेक ठिकाणी मुख्य वाहिनी टाकली नसल्याने पाणी पोहोचण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणारा हा प्रकल्प रखडल्याने या भागाच्या विकासाला खीळ बसली आहे.

माणिकराव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आपल्या मतदारसंघातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी त्यांनी लिफ्ट इरिगेशन योजना आणली. थाटात उद्घाटनही झाले. निधी व इतर सर्व अडचणी सोडविण्यात आल्या. परंतु नंतर सत्तांतर झाले आणि त्यासोबतच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. आता पुन्हा काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. विद्यमान आमदार संजय राठोड यांनीही हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा म्हणून वरचेवर पाठपुरावा व निधी उपलब्ध करून दिला. विद्यमान आमदार व माजी आमदार आपली शक्ती पणाला लावून उर्वरित प्रकल्प पूर्ण करणार का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

वितरित केलेले ठिबकचे साहित्य पडून

या प्रकल्पातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचे साहित्य अनुदानावर देण्यात आले. प्रकल्पाचे पाणी एक वर्षानंतर मिळाल्याने सर्व साहित्य पडल्या पडल्या खराब झाले. यातील ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशाच शेतकऱ्यांचे संच सुस्थितीत आहेत. उर्वरित ७५ टक्के संच खराब झाले आहेत. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना ठिबक संचाचे साहित्य दिल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. यातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाइपलाइन पोहोचली आहे. उच्च दाबामुळे अनेक ठिकाणी पाइप लिकेज व फुटण्याचे प्रसंग वारंवार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना ठिबक संचाव्यतिरिक्त खुले पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पाणी वाटप संस्था कागदोपत्री

या प्रकल्पाचा आत्मा असलेल्या पाणी वाटप संस्था अद्याप कागदोपत्रीच आहेत. ५७ पाणी वापर संस्थांची नोंदणी कागदोपत्री झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. त्यामुळे पाणीवाटपाचे घोडे अडले आहे. संस्था नोंदणीनंतर मुख्य प्रवर्तकाच्या ठिकाणीच अनेक संस्था थांबून आहेत. शासकीय नियमानुसार पाणी वाटप संस्था अपडेट नसल्याने गोंधळ निर्माण झाला. एवढ्या वर्षात पाणी न पोहोचल्याने पाणी वाटप संस्थांमध्ये नैराश्य आहे. सर्व संस्था अपडेट करून कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

आयव्हीआरसीएल कंपनी दिवाळखोरीत

कंपनीचा तुघलकी, संथ कारभार, निकृष्ट साहित्य व प्रकल्प होण्यास लागलेला मोठा वेळ यामुळे कंपनी आर्थिक दिवाळखोरीत आल्याने प्रकल्पाला ब्रेक लागला. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीचे काम जोमात झाले. मात्र, जसजसा कालावधी लोटत गेला तसतसा एकंदर प्रकल्पाचा खर्च वाढत गेला. भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जामुळे प्रकल्पाचे वाटोळे झाले. सुरुवातीच्या टप्प्यातच प्रकल्पाला लागणारे विविध आकाराचे पीव्हीसी पाइप एकाच वेळेस आणून ठेवले. प्रकल्प दिरंगाईने व उघड्यावर राहिल्याने ते पाइप ऊन, पाऊस आणि वारा झेलत जागेवरच जुखार झाले. यातील काही पाइप शेतात टाकले असता टेस्टिंगदरम्यान ते जागोजागी फुटत असल्याने पाणी पुढे जातच नाही. १४ वर्षांत इतर साहित्यही सडून जीर्ण झाले.

शेतीचे माती परीक्षण करूनच शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करावे. पारंपरिक शेतीसोबतच इतरही नगदी पिकांचा विचार करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटानंतर लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून काही उद्योजकांना आणून व्यापारी पिकांचे नियोजन करणार आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे सहकार्य घेऊ. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व निधीसंदर्भात लक्ष देऊन आहे. तालुक्यात पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा शेतीशी निगडित नवीन उद्योग येणार आहे. ऑस्ट्रेलियातील व्ही. तारा कंपनीसोबत बोलणी झाली असून, करारही अंतिम टप्प्यात आहे.
-संजय राठोड, आमदार

(ignorance from state government to dehni project)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT