देवळी (जि. वर्धा) : सीसीआयला कापूस विकण्याकरिता अनेक शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वीच नोंदणी केली आहे. असे असताना देवळी येथील केंद्रावर विना नोंदणी कापूस गाड्यांची खरेदी सुरू असून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. तर सीसीआयचे चुकारे तत्काळ मिळत नाही. येथे दलाल सक्रिय झाले आहे. प्रतिक्विंटल दोनशे ते 500 रुपयांनी कटणी प्रकार सुरू आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून लॉकडाउन करण्यात आले आहे. परिणामी, सर्वच व्यवहार अडचणीत आले. याची झळ सर्वांना बसली असून शेतकरीसुद्धा सुटले नाही. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच राहिला. आता कापूस विक्री सुरू झाली, पण खासगीत अतिशय कमी भावाने व्यापारी कापूस खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चदेखील निघणे कठीण आहे. म्हणून शेतकरी भारतीय कापूस निगमला कापूस विकण्यास पसंती देत आहे. याकरिता शेतकऱ्यांनी रीतसर नाव नोंदणी केली.
नोंदणी केलेले शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत असून ते तारखेची वाट पाहत आहे. आपला नंबर कधी येईल, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चकरा मारत आहे. तर टोकण नसलेले आणि नाव यादी प्रमाणे नसतानाही काही शेतकरी कापूस विक्रीला आणत आहे. हा प्रकार पाहून अनेक शेतकऱ्यांनी टोकण नसतानाही कापूस विक्रीस आणण्यास सुरुवात केली आहे.
नाइलाजास्तव सीसीआयला विक्रीस आलेला कापूस घेणे भाग पडले. याचा त्रास मात्र, आधी नोंदणी केलेल्या व टोकण मिळालेल्या शेतकऱ्यांना होत आहे. आता नंबर आला नाही तरी कापूस गाडी घेत असल्याने मार्केट यार्डमध्ये कापूस गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. भारतीय कापूस निगमला फक्त 100 कापूस गाड्या घेण्याची परवानगी आहे, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विनंतीवरून विना टोकण कापूस गाड्या घेत आहे. 19 मे रोजी सीसीआयने 182 वाहनातील कापूस खरेदी केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये कटणीचा धंदा करणारे दलाल मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. प्रतिक्विंटल 200 ते 500 रुपये कटनीने शेतकऱ्यांचा कापूस घेऊन आपल्या नावाने टोकण तयार करण्यास शेतकऱ्यांना सांगतात. आडनाव तसेच ठेऊन नाव बदलून देण्यात येत आहे. त्यामुळे काही शेतकरी नावावरून कार्यालयात गोंधळ घालताना दिसले. सीसीआयचे चुकारा वेळत मिळणार नाही. शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी प्रतिक्विंटल 200 ते 500 रुपयांची कटणी देऊन दलालांच्या नावे कापूस टाकत आहे.
मार्केट यार्डमध्ये व्यापारी कापूस खरेदी करण्यास येत नाही. व्यापाऱ्यांना कापूस विकायचा असल्यास शेतकऱ्यांना थेट जिनिंगमध्येच न्यावा लागतो. तिथे गेल्यावर ते आपल्या मर्जीनेच भाव देतात. सध्या खासगीत कापसाला तीन ते चार हजार प्रतिक्विंटल भाव आहे. तर सीसीआय पाच हजार 100 ते पाच हजार 355 रुपये भाव देत आहे. त्यामुळे शेतकरी सीसीआयला कापूस देण्याकरिता प्रतीक्षेत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गरजेपोटी शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आलेला शेतकऱ्यांचा कापूस घ्यावा, अशी मागणी राजेश बकाणे यांनी केली. अन्यथा रास्ता राको आंदोलन करू असा इशारा देताच शेवटी विना टोकण कापूस गाडया घेण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.