खामगाव : सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने बऱ्याच प्रकल्पांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर आता पुन्हा पावसाने दमदार कमबॅक केल्याने तालुक्यातील गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून, ज्ञानगंगा नदीकाठच्या ३६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या गावांना पुराचा फटका बसू शकतो.
सध्या हवामान विभागाने दमदार पावसाची शक्यता वर्तविली असून, तालुक्यातील गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खामगावसह नांदुरा शहराची पिण्याच्या पाण्याची व खामगाव एमआयडीसी समस्या सद्यःस्थितीत मिटली आहे. परंतु, ज्ञानगंगा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाल्याने ज्ञानगंगा नदीकाठी असलेल्या गेरु माटरगांव, श्रीधर नगर, गेरु, वर्णा, दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदूळवाडी, पिं. राजा, घाणेगांव, ज्ञानगंगा (काळवाई), वळती खु., वळती बु, वसाडी खु. वसाड़ी बु. धानोरा खु, धानोरा बु. वडगांव, खातखेड, वडाळी, रसुलपूर, खुदानपूर, नांदुरा तालुक्यातील नांदुरा, भुईसिंगा, निमगांव, नारायणपूर, रामपूर, अवधा बु, अवधा खु, नारखेड, वरुड, डोनारखेड, हिंगणा दादगांव, हिंगणा ईसापूर, दादगांव व दौडवाडा या ३६ गावांना पूराचा फटका बसू शकतो. असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता लोकेश बोंबटकार, निम्न ज्ञानगंगा सहाय्यक अभियंता तुषार मेतकर, शाखा अभियंता सुनील नागपुरे यांनी दिली.
भालेगाव बाजार, काळेगाव, पोरज, दिवठाणा, रोहणा, निमकवळा ढोरपगाव, हिवरा बु., जळका भडंग या गावांच्या पाणी पुरवठा विहिरी ज्ञानगंगा नदी काठी आहेत. त्यामुळे त्यांच्या पाणी पातळी वाढली आहे. तांदुळवाडी सिंचन शाखेअंतर्गत येत असलेल्या गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा, निमकवळा येथील निम्न ज्ञानगंगा, ढोरपगाव येथील लघु प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या तिन्ही धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण केव्हाही पूर्ण क्षमतेने भरून सांडवा प्रवाहीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचे खाली नदीला पूर येण्याची दाट शक्यता असून त्यामुळे पाटबंधारे उपविभाग, खामगाव यांनी ज्ञानगंगा नदीकाठावरील ३६ गावांच्या ग्रामपंचायतींना सरपंच, सचिवांना, नोटिसा देऊन दवंडीद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तीन वर्षापासून १०० टक्के भरतो प्रकल्प
२०१९ च्या दुष्काळानंतर झालेल्या पावसाळ्यांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्प १०० टक्के भरत असून, त्यामुळे शहरवासीयांची चिंता मिटली आहे. तर दोन वर्षाआधीच नव्याने तयार झालेल्या निमकळा येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी साठवण्यास सुरुवात झाल्यापासून हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी याचा मोठा फायदा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.