अमरावती : आयुक्तालयातील दहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, फसवणुकीच्या घटनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. परंतु, कोरोनाचा प्रभाव म्हणून की काय महिला अत्याचार, विनयभंग आणि दुचाकीचोरीच्या घटना कमी झाल्या आहेत.
शहरात दहा ठाण्यांपैकी गाडगेनगर, राजापेठ पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये बारा महिन्यात अत्याचाराचे 76 गुन्हे दाखल झाले होते. यावर्षी त्यात सातने घट झाली असून, 2020 साली नोव्हेंबर अखेरपर्यंत अत्याचाराचे 69 गुन्ह्यांची नोंद झाली. महिला, तरुणींची छेडखानीसारख्या घटनाही मागील वर्षाच्या तुलनेत पाचने घटल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 273 वरून विनयभंगाचे गुन्हे 268 वर आले आहेत. प्राणघातक हल्लाच्या 58 घटना मागीलवर्षी दाखल होत्या. त्या आता 65 वर पोहोचल्या असून, त्यात सातने वाढ झाली. दरोड्याची एकमेव घटना चालू वर्षात घडली.
मागील वर्षामध्ये आयुक्तालयात दरोड्याच्या पाच घटना घडल्या होत्या. त्यात चारने घट झाली. यावर्षामध्ये दिवसा आणि रात्रीच्या घरफोड्यांच्या घटनांमध्ये 45 ने वाढ झाली आहे. 2019 साली बारा महिन्यात 159 घरफोड्या झाल्या होत्या. तर 2020 च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत घरफोडींची संख्या 204 वर पोहोचली. चोरीचे गुन्हे 30 ने कमी झाले. 796 वरून चोरीच्या गुन्ह्यांची संख्या 766 वर पोहोचली. 301 दुचाकी अकरा महिन्यात चोरीस गेल्या आहेत, तर गतवर्षभरात 337 दुचाकी चोरीस गेल्या होत्या. फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढल्या. 112 वरून 128 गुन्हे अकरा महिन्यात दाखल झाले. दुसरीकडे अपहरणाचे गुन्हे घटले असून, 110 वरून हा ग्राफ 76 पर्यंत खाली घसरला. हाणामारीच्या घटना 594 वरून 623 वर पोहोचल्या असून त्यात 29 ने घट झाली.
अपघातात 69 जणांचा मृत्यू -
शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही चालूवर्षात सिमेंट रस्ता बांधकाम सुरू झाल्यानंतर अधिक ताण होता. लॉकडाउन सुरू असतानाही अकरा महिन्यामध्ये अपघातात 69 जणांचा मृत्यू झाला. सन 2019 मध्ये अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 80 होती.
यावर्षात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे कमी करण्यासाठी प्रयत्न केले. छेडखानी रोखण्यासाठी शहरात दामिनी पथक, महिला सुरक्षा पथकाची विशेष मदत झाली. पेट्रोलिंग वाढविल्याचा लाभ झाला.
- डॉ. आरती सिंह, पोलिस आयुक्त, अमरावती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.