चांदूरबाजार (जि. अमरावती) : तालुक्यातील कुरळपूर्णा गावात जावयाने सासऱ्यासह मेहूण्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर जावई पत्नीला दुचाकीवर बसवून पसार झाला. रविवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा - जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा
धनंजय बंडू साबळे (वय २३) व बंडू विश्वनाथ साबळे (वय ४५, दोघेही रा. कुरळपूर्णा) असे मृत मेहूणा आणि सासऱ्याचे नाव आहे, असे पोलिस निरीक्षक सुनील किनगे यांनी सांगितले. भांडण मिटावे म्हणून मध्यस्थी करण्यासाठी आलेले विश्वनाथ साबळे (वय ७५) हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवी सुरेश पर्वतकर (वय २३, रा. डोंगरगाव, दर्यापूर), असे दुहेरी खून करून पसार झालेल्या जावयाचे नाव आहे. रवीविरुद्ध चांदूरबाजार पोलिसांनी सासरा व मेहूण्याचा खून करून पत्नीचे बळजबरीने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या दुहेरी हत्याकांडामुळे कुरळपूर्णा गावात खळबळ उडाली. दीड वर्षापूर्वी रवी याचा साबळे यांच्या मुलीसोबत आंतरजातीय विवाह झाला होता. लग्नानंतर पतीपत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वादविवाद सुरू झाले. त्यामुळे पाच महिन्यांपासून रवी पर्वतकर याची पत्नी कुरळपूर्णा येथे माहेरी आली होती. त्यांच्यात अंतर्गत समझोता झाल्यानंतर ते दोघेही विभक्त राहत होते.
हेही वाचा - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची...
बंडू साबळे हे अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात काम करून येथेच राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा धनंजयसुद्धा अमरावतीमध्ये होता. माहेरी आजी, आजोबांसोबत रवी याची पत्नी असे तिघे राहत होते. रविवारी सायंकाळी रवी पर्वतकर हा डोंगरगाव येथून आपल्या सासरी पत्नीला भेटण्यासाठी गेला. तिने घरी परत यावे म्हणून तो आग्रह करीत होता. पतीपत्नीमध्ये तिच्या माहेरी वादविवाद झाला. त्यांच्यातील वाद झाल्यानंतर अमरावती येथे राहत असलेले रवीचे सासरे व मेहूणा गावात पोहोचले. त्यांनी विभक्त राहू लागलेल्या जावयाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाद पराकोटीला पोहोचला. अखेर मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचले. रवीने मेहूणा धनंजय व सासरे बंडू साबळे यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. सोबतच रवीचे आजेसासरेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर रवीने पत्नीला बळजबरीने दुचाकीवर बसवून तो पसार झाला. गंभीर जखमी सासरे व मेहूण्याचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. चांदूरबाजार पोलिसांनी यात खुनानंतर पत्नीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला.
अपहरण केलेल्या पत्नी व रवी याचा सोमवारपर्यंत (ता. १५) शोध लागू शकला नाही. त्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली.
- सुनील किनगे, पोलिस निरीक्षक, चांदूरबाजार ठाणे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.