भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे आग लागून १० नवजात बाळांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर अनेक गावांमध्ये चुलीदेखील पेटल्या नाहीत. त्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह बरेच मंत्री भंडाऱ्याला आले, विश्रामगृहावर थांबले आणि जेवले देखील. पण, कुणीही मांसाहार केला नाही. मात्र, सोमवारी या विश्रामगृहावर चक्क देशी कोंबडे, मासे झिंगे शिजले अन् आलेल्या लोकांनी त्यावर तावही मारला.
राज्यातील कोणताही मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला की संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी मंत्र्यांसोबतच त्यांच्या पीएंची देखील बडदास्त ठेवण्यात कुठलीही कसर बाकी ठेवत नाहीत. एवढेच काय तर मंत्र्यांच्या वाहनचालकांची देखील 'हाजी हाजी' केली जाते. ऐरवी हे सर्व ठीक आहे. पण शनिवारी भंडाऱ्यात कोणती घटना घडली, त्यानंतर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यात काय वातावरण आहे, याचेही भान सोमवारी ठेवण्यात आले नाही. रुग्णालयांची काय अवस्था आहे, मृतक बाळांच्या घरी काय परिस्थिती आहे, याची पाहणी करण्यासाठी आणि पीडितांचे सांत्वन करण्यासाठी राज्यातील मंत्री येत आहेत. याचे तरी भान ठेवून त्यांच्या जेवण्यासाठी काय व्यवस्था केली पाहिजे, याचा विचार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे, अशा चर्चा परिसरात सुरू आहेत.
हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...
व्हिडिओ झळकले सोशल मीडियावर -
सोमवारी विश्रामगृहावर काही कर्मचारी चिकन, मासे आणि झिंग्यांवर ताव मारतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर झळकल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. एकच चर्चा सुरू झाली की जिल्ह्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना, अजूनही जिल्ह्याच्या काही गावांमध्ये घरांतील चुलीदेखील पेटलेल्या नाहीत आणि समाजाचे रक्षक म्हणवणारे मिटक्या मारत मांसाहार कसा काय करू शकतात. मृत नवजात बाळांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेले लोक एवढे कसे असंवेदनशील असू शकतात, हाच प्रश्न आज जिल्हावासीयांना पडला आहे.
करणाऱ्यालाच कळायला हवे -
ज्यांनी कुणी विश्रामगृहावर आजची जेवणाची व्यवस्था केली, त्या अधिकाऱ्यांच्या संवेदना कुठे मेल्या? असा परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. वेळ, काळ, प्रसंग याचा कुठलाही विचार न करता केवळ मंत्र्यांना आणि त्यांच्या टिमला खूश करण्यासाठी ज्यांनी कुणी हा आटापिटा केला, त्यामुळे खरंच मंत्र्यांना तरी बरे वाटेल का? याचा विचार व्हायला हवा होता. बाकी काहीही असो गरिबाचं काय हाय भौ, जगले काय अन् मेले काय.. गरिबाच्या जिवाची किंमत कोनालेच नाही भौ, काल-परवा एका मृत बाळाच्या बापाने दिलेली ही प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते.
संपादन - भाग्यश्री राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.