अमरावती : उद्धव ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील 28 जिल्ह्यातील 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचा समावेश आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतक-यांबाबत एक सल्ला दिला आहे. असे केल्यास शेतकरी मरेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेतील, असा बच्चू कडूंचा दावा आहे.
ठाकरे सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज दोन लाख रुपयांपर्यंतचे आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या यादीत 68 गावांतील 15,358 शेतकऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यामध्ये समावेश होता. योजनेअंतर्गत सुमारे 36 लाख 45 शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. त्यापैकी 34 लाख 98 हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती राज्य शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाली आहे. त्यापैकी 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना सुमारे चौदा हजार कोटींची कर्जे माफ होतील असा अंदाज आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात करुन ठेवली आहे. राज्य शासनाने आतापर्यंत सुमारे 25 हजार कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत 72,947 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर व्यापारी बॅंका 24 तासांमध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका 72 तासांमध्ये संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीचे लाभ देणार आहेत.
दुसऱ्या यादीत राज्यातील 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 15 जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर 13 जिल्ह्यातील अंशत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर्तास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यांचा या दुसऱ्या यादीत समावेश नाही. त्यांना 29 मार्चनंतर निवडणुका संपल्यानंतर योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
पेरणी ते कापणी पर्यंतची काम रोजगार हमी योजनेतून करा
पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी, ज्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च थोड्या प्रमाणात कमी होईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तसा प्रस्तावही आपण मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रातून संपूर्ण देशभरात पोचली आहे. या योजनेत थोडा बदल करून आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवार, कोरडवाहू शेतकरी आणि त्यानंतर सिंचन सुविधा असणारे शेतकरी अशा प्राधान्यक्रमाने मजुरीचा खर्च देण्यात आला तर शेतकऱ्यांच्या जीवनमानावर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशाप्रकारे जर ही योजना राबवली तर आजन्म शेतकऱ्यांच्या मुखात उद्धवजींचे नाव राहील असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.