चांदूरबाजार (जि. अमरावती) ः जन्मदात्या आईनेच दिव्यांग मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. हृदयाचा थरकाप उडवून देणारी ही घटना शहरातील गुलाबराव महाराजनगर येथे सोमवारी (ता. सात) रात्री घडली. हत्या व आत्महत्या करणारी महिला मूळची यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या केल्यानंतर आत्महत्या करणारी महिला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरुड या गावची रहिवासी आहे. माधुरी गजानन शिंगणपुरे (वय 35) असे या महिलेचे नाव असून तिला ऋषी शिंगणपुरे (वय 10) हा मुलगा असून, तो दिव्यांग आहे.
आपल्या संसाराला कंटाळून सदर महिला आपल्या दिव्यांग मुलाला घेऊन प्रथम अमरावती व नंतर चांदूरबाजार येथे बसने दाखल झाली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सदर महिला गुलाबबाबनगरमध्ये गेली व तेथे आपल्या मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. तसेच स्वतःच्या हातावर व मानेवर ब्लेड मारून जीवन संपवले.
पोलिसांनी घटनास्थळावरून लेडीज बॅग व मोबाईल जप्त केला. घटनास्थळी सापडलेल्या बॅगमध्ये मोबाईल व अमरावती-चांदूरबाजार एसटी बसची तिकिटे सापडलीत. त्यावरून दोघांचीही ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या मोबाइलवरून नातेवाइकांशी संपर्क केला. या वेळी मृतक महिलेने आर्णी येथील बहिणीकडे मृत्यूपूर्वी चिट्ठी लिहून ठेवली होती. रात्री वेळाने दोन्ही मृतांचे नातेवाईक पोलिस ठाण्याला पोहोचून ती चिट्ठी पोलिसांना दिली.
त्या चिट्ठीनुसार मृत महिला आपल्या सांसारिक जीवनाने कंटाळली असून मुलगा दिव्यांग असल्याने त्रस्त होऊन जीवन संपवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वेळी पोलिसांनी मृत महिला माधुरी गजानन शिंगणपुरे यांच्या विरोधात खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे, वीरेंद्र अमृतकर, महेश देशमुख करीत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.