नागपूर : चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना धूर सोडणाऱ्या बिस्किटांची भूरळ पडली आहे. ही बिस्किटे नायट्रोजनमध्ये बुडवले जात असल्याने त्यातून धूर निघतो. हा धूर फुफ्फुसाला इजा करतो. त्यामुळे श्वसन विकार संभवतात, असे निरीक्षण एका अभ्यासात नोंदविण्यात आले आहे. हे संशोधन रेस्पिरेटरी केस रिपोर्ट हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
नागपूरसह राज्यातील विविध भागात लग्न समारंभ, वाढदिवस, विविध मेळाव्यांत तोंडातून धूर सोडणाऱ्या बिस्किटांचे फॅड आले आहे. लहान मुलांपासून सगळ्याच वयोगटातील नागरिकांना त्याचे आकर्षण वाटते. मात्र, ही बिस्किटे लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेली असतात. तोंडात कोंबल्यावर ती धूर सोडतात, ती नायट्रोजनची वाफ असते.
ही नायट्रोजनची अतिथंड वाफ तोंडाद्वारे फुफ्फुसांपर्यंत जाते आणि इजा करते. त्यामुळे अस्थमासारखे श्वसन विकार होतात. क्रिम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने बिस्किट सेवन केलेल्या मुलावर अभ्यास केला. काही महिन्यापूर्वी एक १० वर्षीय बालक महिनाभरापासून कोरडा खोकल्याची समस्या घेऊन आला होता.
त्याला बुजलेले नाक, गळ्यात खवखव आणि डोकेदुखीही होती. सुरुवातीला मुलाने इतर खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. प्रतिजैविकाची मात्राही घेतली होती. परंतु आराम झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाला नागपुरातील क्रीम्स रुग्णालयात श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्याकडे उपचारासाठी आणले.
काय आहेत लक्षणे
गळ्यात खवखव
कफ आणि सर्दी
अशक्तपणा
नाकातून पाणी वाहणे
नाक खाजवणे
ताप व अंगदुखी
बिस्किटाचे धोके
लिक्विड नायट्रोजनचे तापमान शुन्याहून कमी असते, हे आरोग्यास अपायकारक असते
हे बिस्कीट खाल्ल्याने श्वासनलिकेतील तापमान अचानक कमी होते
रुग्णाला गळ्यात अस्वस्थ आणि श्वसननलिका बधिर झाल्यासारखे वाटू लागते
रुग्णाच्या तपासणीतून संशोधन
मुलाने काही दिवसांआधी धूर सोडणारे नायट्रोजन बिस्कीट खाल्ल्याचे पुढे आल्यानंतर डॉ. अरबट यांनी याची दखल घेतली. आपल्या सहकारी डॉक्टरांच्या मदतीने संशोधनात्मक काम केले. शेवटी हा शोध प्रबंध नावाजलेल्या रेस्पिरेटरी केस रिपोर्ट या हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. हे संशोधन ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्या मार्गदर्शनात श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. गौरी घाडगे, डॉ. परिमल देशपांडे, डॉ. स्वप्निल बाकमवार व डॉ. श्वेता चौरसिया यांनी केले.
लिक्विड नायट्रोजन वापरून बनवलेल्या बिस्किटांचे सेवन केल्याने अस्थमा, श्वसन विकार वाढतात, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी या बिस्किटांचे सेवन टाळावे. तमिळनाडूसारख्या राज्यात यावर बंदी आहे. महाराष्ट्रातही यावर बंदी हवी.
- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ, क्रीम्स रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.