Aadarsh Bhure sakal
नागपूर

Aadarsh Bhure : गरिबीवर मात करत ॲथलेटिक्समध्ये भरारी

युवा वेगवान धावपटू आदर्श भुरेच्या संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास.

नरेंद्र चोरे

नागपूर - वडील अर्धांगवायूमुळे पाच वर्षांपासून अंथरुणावर आहेत. तर आई डबे बनवून घर पतीसह मुलांचे पोट भरते. अशा बिकट परिस्थितीत राष्ट्रीय धावपटू असलेल्या मुलाने ॲथलेटिक्समध्ये देशभर नाव कमावून क्रीडा जगतावर आपली छाप सोडली. अशीच कामगिरी भविष्यातही सुरूच ठेवत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तसेच स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी नोकरी मिळवून आई-वडिलांची गरिबी दूर करण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली.

ही संघर्षपूर्ण पण तेवढीच प्रेरणादायी कहाणी आहे मैदानावर सुसाट गतीने धावणाऱ्या आदर्श भुरेची. २३ वर्षीय आदर्शने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या ७२ व्या राज्य वरिष्ठ गट ॲथलेटिक्स स्पर्धेतील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नागपूर जिल्ह्याला पदक मिळवून दिले होते.

या ऐतिहासिक कामगिरीनंतर आदर्श व रौप्यपदक जिंकणारा त्याचा नागपूरकर सहकारी गोपाल पलांदूरकर प्रसिद्धीच्या झोतात आले. आदर्शला ॲथलेटिक्समध्ये हे यश सहज मिळालेले नाही. त्यासाठी त्याला व त्याच्या कुटुंबाला फार कष्ट सोसावे लागले.

दत्तात्रयनगर येथे राहणाऱ्या आदर्शच्या वडिलांचा (मनोहर भुरे) एकेकाळी वीटभट्टीचा व्यवसाय होता. मात्र पाच वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळले. यामुळे कुटुंबासाठी पत्नीला (रेखा भुरे) पुढे यावे लागले. या माऊलीने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत डबे बनविण्याचा (मेस) व्यवसाय सुरू केला.

पतीचा उपचार, मुला-मुलीचे शिक्षण व क्रीडा कौशल्याचा खर्च पूर्ण करताना तिला कसरत करावी लागत आहे. महागाईत एवढ्याशा कमाईत पोट भरणे कठीण असल्यामुळे नाईलाजाने बहिणीलाही (वैष्णवी) शिक्षणासोबतच पार्टटाइम नोकरी करावी लागत आहे.

ॲथलेटिक्सपुरता विचार केल्यास नागपूर व विदर्भात साधारणपणे लांब पल्ल्याच्या शर्यतींनाच अधिकाअधिक पसंती दिली जाते. बहुतांश खेळाडू याच क्रीडा प्रकारांमध्ये करिअर करतात. मात्र आदर्शने प्रवाहाच्या विरुद्ध जात लहान पल्ल्याच्या १०० व २०० मीटर प्रकाराची निवड केली. पुलगावच्या आर. के. कॉलेजमध्ये शिकत असताना सुरुवातीला शालेयस्तरावर तो लांब उडी करायचा.

मात्र यात फारसे मन न रमल्याने तो १०० व २०० मीटरच्या स्पर्धांमध्ये धावू लागला. अल्पावधीतच जिल्हा, विभागीय, राज्य, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवत त्याने थेट राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली. आदर्शने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये पन्नासावर पदके जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली.

पेट्रोल भरण्यासाठीही पैसे नसतात !

नागपुरातील नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचा खेळाडू असलेला आदर्श हा राष्ट्रकुल पदकविजेते आंतरराष्ट्रीय धावपटू व प्रशिक्षक रितेश आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर सराव करतो. मात्र बऱ्याचवेळा त्याच्याकडे दुचाकीमध्ये पेट्रोल भरायलाही पैसे नसतात. अशावेळी तो प्रॅक्टिससाठी मित्राच्या गाडीवर बसून जातो. धावपटूला स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी प्रोटिनयुक्त सकस आहार खूप गरजेचा असतो. आदर्शला तोदेखील मिळत नाही. त्यामुळे मीठ भाकर खाऊनच त्याला स्पर्धेत धावावे लागते.

आदर्शची आतापर्यंतची उपलब्धी

-जानेवारी २०२४ मध्ये चेन्नईतील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक.

-खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा महोत्सवातील १०० मीटर शर्यतीत ब्रॉंझपदक.

-पूर्व-पश्चिम-उत्तर आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत १०० मीटरमध्ये ब्रॉंझपदक.

-अश्वमेध राज्य क्रीडा महोत्सवातील १०० व २०० मीटर शर्यतीत दोन सुवर्णपदके.

-राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धेतील १०० व २०० मीटर शर्यतीत विक्रमाची नोंद.

कुटुंबाला लावायचाय आर्थिक हातभार

सेलू येथील विद्याभारती कॉलेजमध्ये बी.ए. करीत असलेल्या आदर्शचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे. मात्र हे सोपे नसल्याचे तो म्हणाला. त्याचवेळी गरिबीचे चटके जवळून अनुभवल्यामुळे स्पोर्ट्स कोट्यातून एखादी सरकारी नोकरी मिळवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची त्याची इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT