वेलतूर (जि. नागपूर) : एकेकाळी खेड्यातल्या भोजनाच्या ताटातील आंबाडी तारांकित हॉटेल, रेस्टॉरंट व ज्यूससेंटरमधील महत्त्वाचे पेय ठरत असून तिची मागणी वाढली आहे. मात्र, लागवडीअभावी ती मिळत नसल्याचे सर्वत्र चित्र आहे.
उन्हाळ्यात उन्हाची काहिली कमी करणारा आणि खेड्यांमध्ये घरोघरी वापरल्या जाणाऱ्या अंबाडीच्या सरबताने सध्या मोठीच भुरळ घातली आहे. त्याला शहरात मोठी मागणी आली आहे. सरबत उद्योगात सध्या तो ज्याच्या त्याच्या आवडीचा ‘मुकूटमणी’ ठरत आहे. वैणगंगेच्या नदीकाठच्या शेत-शिवारात आधी याची मोठ्या प्रमाणात आंबाडीची मुक्त वाढ व लागवड होत असे.
याचे बोरू (ताग) काढून शेती व जनावरांना लागणारे दोरखंड व इतर साहित्य बनवून पाल्याचा व बिजाचा खाण्यासाठी उपयोग होत असे. बदलत्या शेतीमध्ये हे पीक मागे पडले असले तरी सरबत उद्योगास आता नवी उभारी आल्याने पारंपरिक पेय म्हणून आंबाडीला मोठी पसंती मिळत आहे.
कुही तालुक्यात आंबाडी प्रक्रिया व सरबत उद्योगात मोठा वाव आहे. मात्र, त्या दिशेने सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे. वेलतूर परिसरात कुही तालुक्यात धानाची शेती होती. धानाच्या बांधातील पारीवर तुरी वा तीळ लावले जात. सोबत पावसाच्या दिवसांत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर आंबाडी ही वनस्पती सहजच उगवते.
या वनस्पतीच्या पाल्याचा उपयोग भाजीमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो. आयुर्वेदात आंबाडीला मानाचे स्थान आहे. दिवाळीच्या सुमारास आंबाडी परिपक्व होते. परिपक्व झाल्यानंतर आंबाडीचे फळ लालभडक होते. चविने आंबट असल्याने या फळांचा ग्रामीण भागात भाजीमध्येही उपयोग केला जातो. मात्र, या आंबाडीचा सर्वात जास्त उपयोग सरबतसाठी केला जातो.
परिपक्व झाल्यावर आंबाडीच्या झाडाची कापणी करून घरी आणले जाते. नंतर फळावरील लालभडक दिसणारा भाग वेगळा करून वाळविला जातो. चांगला वाळल्यानंतर खलबत्यामध्ये बारीक कूट केला जातो. नंतर बारीक करण्यात आलेल्या या कुटाचा उन्हाळ्यात सरबतासाठी उपयोग करण्यात येतो. खेड्यात या सरबतास मोठी पसंती आहे.
शहारात स्थाईक झालेले अनेक जण गावी आल्यावर आंबाडीचे हे कूट घेऊन जात असतात. त्याचा सरबतासाठी उपयोग करतात. खेड्यात उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस कोणी पाहुणा आला तर हमखास त्याच्या हातात आंबाडीच्या सरबताचा ग्लास ठेवला जातो. आंबाडीचे सरबत उन्हाळ्यात अतिशय गुणकारी समजले जाते.
व्यावसायिक रूपाने या आंबाडीवर प्रक्रिया करून त्याचे सरबत तयारा करण्यात आले तर या आंबाडीच्या पिकास चालणा मिळू शकते. मागणी वाढल्यास शेतकरी आंबाडीचे पिकही घेऊ शकतात. उद्योगाचे रूप दिल्यास काही तरुणांना रोजगारही मिळू शकतो. यासाठी एखाद्या उद्योजकाने पुढे येण्याची गरज आहे. एवढेच नव्हेतर आंबाडीच्या बियांमध्ये तेलाची मात्रा मोठ्या प्रमाणात आहे. या आंबाडीचा उपयोग तेलासाठी होतो. या निमित्ताने दोन उद्योग उभे राहू शकतात, हे विशेष.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.