नागपूर : शहरात रेल्वेने लावलेल्या होर्डिंगसाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. रस्त्यांवर लावलेले रेल्वेच्या जागेवरील सर्वच होर्डिंग अवैध आहेत. याबाबत महापालिकेने रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबईत होर्डिंग कोसळून रविवारी तब्बल १४ जणांचा हकनाक मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईसारखीच घटना शहरात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रेल्वेच्या जागेवरील होर्डिंगची संख्या सुमारे १५० आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी सातत्याने रेल्वेच्या डीआरएमशी पत्राद्वारे पाठपुरावा केला. मात्र त्याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. रेल्वे प्रशासनाकडून होर्डिंगची परवानगी देताना नियमच पाळले जात नसल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरातील होर्डिंगसाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. नगरविकास विभागाने ९ मे २०२२ ला अधिसूचना प्रसिद्ध करून या संदर्भात महानगरपालिकेला काही नियम घालून दिले आहे. यानुसार महापालिका होर्डिंग लावणाऱ्यांकडून १३ प्रकारची कागदपत्रे स्वीकारल्यानंतर परवानगी देते.
‘अवैध होर्डिंग काढा’
शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग हे अवैधपणे लावण्यात आले आहे. बहुतांश होर्डिंगचे स्ट्रक्चर योग्य नाही. एमएसईबीच्या उच्च आणि लघुदाब वीज वाहिन्यांच्या बाजूने होर्डिंग आहेत. नियमानुसार विद्युत पुरवठा करणाऱ्या हायटेंशन लाईनच्या बाजूने ते लावता येत नाही. मुंबईच्या घटनेची नागपुरात अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील सर्व होर्डिंगची मंजुरी तपासावी. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अवैध होर्डिंग तत्काळ काढण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक विजय झलके यांनी केली आहे. त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दिले.
नव्याने सर्वेक्षण होणार
वादळी वाऱ्यामुळे मुंबईच्या घाटकोपर भागात पेट्रोल पंपजवळील महाकाय होर्डिंग पडून १४ लोकांचा मृत्यू झाला. तर ७४ जण जखमी झाले. याची दखल नागपूर महानगरपालिकेने घेतली असून शहरातील धोकादायक असे सर्वच होर्डिंगची तपासणी होणार आहे. शहरात तीन ते दहा वर्षापर्यंतचा कालावधी बहुतांश होर्डिंगला झाला आहे. त्यावेळी एजन्सींनी परवानगी घेताना स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिले होते. आता पुन्हा २०२४-२५ करिता होर्डिंगचा नव्याने सर्व्हे होणार असल्याची माहिती आहे.
शहरात १ हजार ७१ मोठे फलक नियमानुसारच!
सध्या शहरात महापालिकेच्या नोंदीला १ हजार ७१ होर्डिंग्स आहेत. शहरात किमान २०० ते १२०० चौरस फुटापर्यंत होर्डिंग लावण्याची परवानगी आहे. त्यासाठी महापालिकेकडे रीतसर अर्ज करावा लागतो. होर्डिंग उभारल्यानंतर महापालिका स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेते. शहरात उभे असलेले १ हजार ७१ होर्डिंग या अटीशर्थींचे पालन करून लागले असल्याचा महापालिकेचा दावा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.