सुमारे अडीचशे वर्षे जुनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या ललित कला संग्रहालयात इतिहास संशोधक शेषशयन देशमुख यांना आढळली आहे.
नागपूर - सुमारे अडीचशे वर्षे जुनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या ललित कला संग्रहालयात इतिहास संशोधक शेषशयन देशमुख यांना आढळली आहे. चित्रांसह रंगीत हस्तलिखित ज्ञानेश्वरीची ही एकमेव प्रत आहे, हे विशेष. समाप्ती लेखानुसार हे हस्तलिखित शके १६८५मध्ये (सन १७६३) साठे उपनाव असलेल्या गोपीनाथसुत नारायणाने लिहिले, असा उल्लेख आहे. व्हर्जिनियाच्या या संग्रहालयामध्ये १९९० मध्ये ही ज्ञानेश्वरी पोहोचल्याची नोंद आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. गुप्ता हे राज्य शासनाच्या पुरातत्त्व खात्यामध्ये होते. वारसा नोंदणी अधिकारी म्हणून १९७६-७७ रोजी त्यांनी या ज्ञानेश्वरीची नोंद पुरातत्त्व खात्याकडे केली होती. ही प्रत शहरातील महाल भागात राहणारे प्रसिद्ध (दिवंगत) कीर्तनकार बाबासाहेब साल्पेकर यांच्याकडे होती. येथूनच १९८६ रोजी ती गहाळ झाली. या ऐतिहासिक ठेव्याला देशामध्ये आणण्यासाठी सांस्कृतिक मंत्री, परराष्ट्र मंत्रालय, प्रशासन किती प्रयत्न करेल, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
शोध कसा लागला?
नोव्हेंबर २०१४ मध्ये अमेरिकेतील अलाबामा विद्यापीठाच्या कला इतिहास विषयाच्या प्राध्यापिका डॉ. कॅथलीन कमिंग्स यांनी इतिहास अभ्यासक डॉ. शेषशयन देशमुख यांच्याशी संपर्क करीत प्राचीन ठेवा पाहण्यासाठी नागपूर भेटीची इच्छा व्यक्त केली. जानेवारी २०१५ मध्ये डॉ. कॅथलीन या भोसले कालीन ठेवा पाहिल्यानंतर प्रभावित झाल्या. याच वेळी त्यांनी अमेरिकेतील एका हस्तलिखित ज्ञानेश्वरीबाबत सांगितले.
तसेच, पुढील भारत भेटी दरम्यान या ज्ञानेश्वरीची छायाचित्रे सोबत आणू, असे आश्वासन डॉ. देशमुख यांना दिले. डिसेंबर २०१५ मध्ये डॉ. कॅथलीन पुन्हा नागपुरात आल्या. त्यावेळी त्यांनी भेट म्हणून दिलेल्या चित्रांवरील उल्लेख आणि वर्णनानुसार ही नागपुरातीलच ज्ञानेश्वरी असल्याचा शोध डॉ. देशमुख यांना लागला. इतिहास संशोधक देविदास लांडगे यांच्या ‘नागपूरचा सांस्कृतिक इतिहास’ आणि मध्यवर्ती संग्रहालयातर्फे शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेतील व्ही. पी. रोडे यांच्या लेखामध्ये चित्रासह या ज्ञानेश्वरीचे वर्णन आढळले. यातील एक चित्र डॉ. कॅनलीन यांनी दिलेल्या छायाचित्राशी तंतोतंत जुळलेही.
असे आहे हस्तलिखित
संपूर्ण रंगीत असलेली ही ज्ञानेश्वरी ६७५ ते ७०० पानांची आहे
नारायण गोपीनाथ साठे यांनी या ज्ञानेश्वरीचे लेखन केले असून पोथी लेखन घराण्यातील असण्याची शक्यता आहे.
संपूर्ण नागपूर बनावटीच्या या ज्ञानेश्वरीत नागपूर चित्र शैलीतील १५० पेक्षा जास्त चित्रे आहेत
आजवर ज्ञानेश्वरीची रचना विविध पद्धतीत करण्यात आली आहे. यातील बरवा पदपद्धती परंपरेतील ही ज्ञानेश्वरी आहे.
ओव्यांमधील प्रसंग अधिक खुलावे म्हणून चित्रांचा उपयोग करण्यात आला आहे. अशी एकमेव सचित्र ज्ञानेश्वरी.
ही ज्ञानेश्वरी बरवा पदपद्धती परंपरेतील असल्याचे संशोधनातून आढळले. प्रतिपाद्य विषयांतील प्रसंग आकर्षक रंगीत चित्राद्वारे यामध्ये मांडण्यात आले आहेत. अशी एकमेव ज्ञानेश्वरी असल्याचा उल्लेख तज्ज्ञांनी केलेल्या नोंदीत सापडला.
- डॉ. शेषशयन देशमुख, इतिहास अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.