नागपूर : तो दोन्ही पायाने अधू. चाकावरच्या खुर्चीतील आयुष्य. स्वतःच्या शारीरिक अकार्यक्षमतेवर त्याने मात केली. अपार कष्ट अन् जिद्दीच्या बळावर तो डॉक्टर झाला. मात्र येथेच थांबला नाही, तर उत्तुंग ध्येयाच्या दिशेने झेप घेत दिव्यांगत्व असताना रुग्णसेवेचा ध्यास घेत त्याने मेडिकलमध्ये एमडी रेडिओलॉजी विषयात विशेषज्ज्ञ होण्याची परीक्षा पास झाला, प्रवेश घेतला. यामुळेच त्याच्या या जिद्दीला सलाम करीत त्याला सोयीचे व्हावे, या हेतूने इलेक्ट्रिक व्हीलचेअर भेट देण्यात येईल.
त्या दिव्यांग डॉक्टरचे नाव अरुण. मुळचा परभणी तालुक्यातील. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचा. बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाला. एमबीबीएसला प्रवेश मिळाला. अरुणला अपघात झाला. तो दिव्यांग झाला. अरुणचे दोन्ही पाय पॅरालॅटिक झाले. तो उभा राहू शकत नाही. आधाराची गरज आहे.
मात्र बुद्धी आणि चिकाटीच्या जोरावर त्याने एमबीबीएस पूर्ण केले. डॉक्टर झाल्यानंतर नोकरी मिळणे कठीण नव्हते. वैद्यकीय अधिकारी म्हणून दिव्यांगांच्या राखीव जागेतून रुजू झाला असता, परंतु तो समाधानी नव्हता. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एमडीसाठी प्रवेश परीक्षा दिली. गुणवत्ता यादीत आला. नुकतेच मेडिकलमध्ये एमडी रेडिओलॉजी विषयात त्याला प्रवेश मिळाला.
हाताने पेडल मारत व्हीलचेअरवरून यावे लागते. ही बाब रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. आरती आनंद यांच्या निदर्शनाला आली. त्यांनी तत्काळ ही बाब अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना सांगितली. अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी अरुणला इलेक्ट्रिकवरील व्हीलचेअर भेट देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले. गुरुवारी (ता. २६) अरुणला इलेक्ट्रिकवरची व्हीलचेअर मिळणार आहे.
स्वत:च्या दिव्यंगत्वाचे भांडवल न करता वैद्यकीय क्षेत्रात विशेषज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी अरुणने बाळगले. त्याने जिद्दीच्या जोरावर यश मिळवले. यामुळे गुणवान अरुणला मदत करणे आमचे कर्तव्य आहे. व्हिलचेअरवरचे आयुष्य जगतानाही तो खचला नाही परिश्रमातून त्याने यश मिळवले. आम्ही सर्व अरुणच्या पाठीशी आहोत.
- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल.
आई बनली आधार
‘आई’ म्हणजे केवळ दोन शब्द नव्हे तर संपूर्ण विश्व त्यात सामावलेले असते. आपल्या मुलांसाठी काहीही करायला नेहमी सज्ज राहणारी आई सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, अरुणला परभणीवरून नागपुरातील मेडिकलमध्ये आणल्यानंतर प्रवेशाच्या वेळी व्हिलचेअरच्या बाजूला उभी राहून दिवसभर ही माऊली आपल्या गुणी मुलाला धीर देत होती. प्रवेश मिळेल असे बळ देत होती. यामुळे अरुणचा आत्मविश्वास वाढत होता. हे चित्र विभागप्रमुख डॉ. आरती आनंद यांनी डोळ्यात साठवले आणि मदतीसाठी त्या पुढे आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.