Nagpur News : आषाढी एकादशी बुधवारी १७ जुलैला आहे. त्यानिमित्त उपवासाला मोठ्या प्रमाणात भगर, साबुदाणा, सिंगाडा व राजगिरापिठापासून बनविलेल्या खमंग पदार्थ आवडीने खाल्ले जातात. गेल्या काही महिन्यात असे पदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ खाताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे.
भगर, साबुदाणा, सिंगाडा व राजगिरापिठ व खाद्यतेल विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्यावे. प्रक्रिया उद्योगात भगर, साबुदाणा, सिंगाडापीठ, राजगिरापीठ, खाद्यतेल यांचे उत्पादन केव्हा झाले, याचा तपशील तपासून घ्यावा. त्या अन्नपदार्थांची मुदत कोणती आहे, ते कालबाह्य झाले काय हे तपासून घ्यावे.
खुल्या भगरीचे पीठ बाजारातून विकत घेऊ नये. भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून त्यानंतरच घरगुती पद्धतीने पीठ तयार करावे. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषूण घेण्याची क्षमता अधिक असते, त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते.
भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगर साठविताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्ब्यात ठेवा, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठविलेली भगर खाऊ नका.
भगरीचा वापर करताना ती स्वच्छ धुवून घ्यावी. उपवासाचे अन्न पदार्थ व घटक पदार्थ खरेदी करताना विक्रेत्यांकडून बिल घ्यावे. भगर, साबुदाणा, सिंगाडा व राजगिरा पिठापासून तयार उपवासाचे अन्न पदार्थ लगेच सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले. भेसळ किंवा आक्षेपार्ह पदार्थ आढळल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या (०७१२- २५६२२०४) कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस या प्रजातीच्या बुरशीचा प्रभाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखे विषद्रव्य तयार होतात. जुलै महिन्यातील तापमान व आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकुल असते. अशा बुरशीचा प्रादूर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास विषबाधा होऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.