नागपूर : भाजप चोवीस तास राजकारणच करणारा पक्ष आहे. त्यांनी कितीही जन आशीर्वाद काढल्या तरी महाविकासआघाडीचे काम जनतेला आवडत आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वादसुद्धा आम्हालाच मिळणार असल्याचा दावा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
कोविडची तिसरी लाट रोखण्यासाठी शुक्रवारी ‘मिशन लसीकरण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विदर्भासाठी दोनशे लसीकरण वाहनांचे वितरण केले जाणार आहे. यासाठी बाळासाहेब थोरात नागपूरला आले आहे. नागपूर विमानतळावर बोलताना त्यांनी भाजपच्या यात्रेने महाविकासआघाडीला काही फरक पडणार नसल्याचे सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीची दर्शन घेतल्यानंतर ते स्थळ स्वच्छ करण्यात आले. या प्रश्नावर थोरातांनी, त्यांचा उद्देश त्यांनाच विचारा असे सांगून हात झटकले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकासआघाडीत एकमत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. केंद्राने घेतलेल्या निर्णयातील दोषही ते दाखव आहे. न्यायालयातसुद्धा त्यांनी योग्य बाजू मांडली. मात्र, भाजप यात अनावश्यक ढवळाढवळ करून राजकारण करीत असल्याचा आरोप थोरातांनी केला.
आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्राने घेणे आवश्यक आहेत. ५० टक्क्यांच्या वर आरक्षण वाढवल्यास सर्वच समाजाला न्याय देता येऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारला ते करायचे नाही. बैलांच्या शर्यती व्हाव्यात या विचारांचे आम्ही आहोत. यापूर्वी कोणी बंदी घातली, काय केले हे प्रश्न आता अप्रस्तुत आहे. आता केंद्रात भाजपची सत्ता आहे. बैलांच्या शर्यतीचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. राज्यात एक बोलायचे, केंद्राने वेगळेच निर्णय घ्यायचे अशी भाजपची दुटप्पी भूमिका आहे. भाजपचे हे धोरण नेहमीचेच असल्याचा आरोपही थोरात यांनी केला. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.