नागपूर : दहा वर्षीय चिमुकला इच्छाशक्तीच्या जोरावर एखादे पुस्तक लिहू शकेल यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, शहरातील काव्य अग्रवाल या मुलाने ही बाब खरी करून दाखविली आहे. हिंदू धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या भगवद्गगीतेचा त्याने ‘भगवद्गगीता किडटास्टिक’ नावाने इंग्रजी भाषेमध्ये स्वैर अनुवाद केला आहे. विशेष म्हणजे १८ अध्याय असलेले हे पुस्तक त्याने फक्त दोन महिन्यामध्ये पूर्ण केले.
त्याची आई रश्मी अग्रवाल गृहिणी असून वडील व्यावसायिक आहे. वयाच्या अवघ्या दीड वर्षाचा असताना हनुमान चालिसा त्याला तोंडपाठ होती. त्याला भगवान श्रीकृष्णाचे खूप आकर्षण आहे. कुठेही गेला तरी श्रीकृष्णाची मूर्ती सोबत असते. याच आकर्षणापायी त्याने प्रथम भगवद्गगीता वाचली. मात्र, इंग्रजी भाषेमध्ये तो शिक्षण घेत असल्याने काही शब्द त्याच्याकरीता देखील नवीन होते. याच अर्थाच्या शोधात असताना त्याने या ग्रंथाला इंग्रजीमध्ये स्पष्ट केले. त्याला भगवद्गगीतेतील १८ अध्याय इंग्रजीत व हिंदीमध्ये लिहिण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागला.
काव्यच्या श्रद्धेनुसार, भगवद्गीतेमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या रोजच्या दिनचर्येशी जोडते. त्याने फक्त अध्यायच लिहिले नसून या पुस्तकाला सुंदर चित्रांनी सजविलेसुद्धा आहे. काव्य केवळ अभ्यासातच श्रेष्ठ नाही, तर चित्रकला, क्रीडा, लेखन अशा विविध क्षेत्रामध्ये रस आहे. सर्वात कमी वयाचा भगवद्गीता लेखक म्हणून आणि सर्वात जास्त पारितोषिक विजेता म्हणून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये दोनदा आपले नाव नोंदविले आहे. विविध उपक्रमामध्ये आतापर्यंत १५० हून अधिक प्रमाणपत्रे आणि २५ हून अधिक पदके जिंकली आहेत. यासोबतच त्याला ‘नेशन स्टार आयकॉन किड्स अचिव्हर’ पुरस्कारही मिळाला आहे. लॉकडाउनचा त्याने पूर्ण सदुपयोग करीत कलात्मक कामे केली. आपल्या आयुष्यामध्ये संकट येत राहतात. आपण खचून जायला नको. प्रत्येक संकटाचा धीराने सामना करायला हवा. जीवनातील प्रत्येक संकटाचे निराकरण होऊ शकते, अशी शिकवण त्याने या ग्रंथातून घेतल्याचे सांगतो.
"प्रत्येक देवाच्या कथेबाबत काव्यला बाल वयापासूनच कुतूहल होते. पालक म्हणून आम्हाला शक्य झाले तितके आम्ही त्याला माहिती दिली. श्रीकृष्णाच्या आकर्षणापोटी त्याने भगवद्गीता वाचायचे ठरविले. यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली."
-रश्मी अग्रवाल, काव्यची आई
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.