नागपूर : सुरुवातीला कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कारासाठी कुठलेही शुल्क न घेता उदार झालेली महापालिका आता घाटांवर त्यांच्या शुल्क वसूल करीत आहे. त्यामुळे थेट रुग्णालयातून घाटांवर येणाऱ्या पार्थिवाला शेवटचे बघण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांना शोक आवरून ऐनवेळी पैशासाठी धावाधाव करावी लागत आहे. यातूनच घाटांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी व नातेवाईक असा वादही निर्माण होत आहेत.
एप्रिल, मेमध्ये कोरोनाबळींची संख्या अत्यंत अल्प होती. याशिवाय घाटांवर एक किंवा दोन नातेवाइकांना दूर उभे ठेवून विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जात होते. सुरुवातीला कोरोनाची मोठी भीती असल्याने नातेवाईकही अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नव्हते. अशावेळी संवेदना दाखवत महापालिकेने घाट असो की कब्रस्थान, अनेकांचे अंत्यसंस्कार निःशुल्क केले. मात्र जुलैपासून मृतकांची संख्या वाढू लागली.
मागील महिन्यापासून तर दररोज ४० ते ६० जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. यातील काहींचा मृत्यू मेयो, मेडिकलमध्ये उपचारादरम्यान होत आहे. येथून पार्थिव थेट जवळच्या घाट किंवा कब्रस्थानमध्ये नेण्यात येत आहे. त्यामुळे शोकाकूल कुटुंबातील नागरिकही आता भीती सारून थेट घाटावर पोहोचत आहे. महापालिका अंत्यसंस्कासाठी लाकडाची मागणी करणाऱ्यांकडून अडीच हजार रुपये शुल्क वसूल करीत आहेत.
अनेकदा शोकमग्न नातेवाईक पैसे जवळ घेण्यास विसरून जात असल्याने त्यांना वेळेवर पैशाची जुळवाजुळव करावी लागत आहे. गंगाबाई घाट येथे अशाच एका प्रकरणातून कर्मचारी व नातेवाइकांचा वादही झाला. असे अनेक प्रकार विविध घाटांवर घडले. यातून महापालिकेने कोरोनाबळीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी संवेदना कायम ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
लाकडांसाठी अडीच हजार
अंबाझरी, मोक्षधाम, गंगाबाई घाट, सहकारनगर, मानकापूर या घाटांवर लाकडाने अंत्यसंस्कार करण्यासाठी कोरोनाबळींच्या नातेवाईकांकडूनही अडीच हजार रुपये शुल्क घेतले जात आहे. मात्र, त्याचवेळी वैशालीनगर घाटांवर अद्यापही लाकडांनी अंत्यसंस्कार निःशुल्क आहे. त्यामुळे काही घाटांवर वसुली व काही घाटांवर निःशुल्क अंत्यसंस्कार असे चित्र आहे.
अंबाझरी, मोक्षधाम, गंगाबाई घाट, सहकारनगर, मानकापूर घाटांवर पर्यावरणपूरक विद्युतदाहिनी आहे. यात अंत्यसंस्कारासाठी पैसे लागत नाही. नातेवाइकांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. परंतु नागरिक लाकडांचाच अट्टहास करतात. लाकडांसाठी आधीपासूनच शुल्क वसूल केले जाते. केवळ वैशालीनगर घाटासंदर्भात लाकडावर अंत्यसंस्कारासाठी शुल्काचे आदेश निघाले नाही. त्यामुळे तेथे निःशुल्क आहे.
डॉ. गजेंद्र महल्ले, अधिकारी, मनपा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.