नागपूर : एकाच दिवशी दोन कार्यक्रम घेऊन एकमेकांच्या कार्यक्रमांना दांडी मारायची आणि कुरघोडी करीत आपापला गट सांभाळून ठेवायचा ही काँग्रेसची परंपरा राज्यात सत्ता आल्यानंतरही कायम आहे. त्यामुळे नागपूरमध्ये मागील महापालिका निवडणुकीपासून सुरू झालेले धुमशान आगामी निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
शुक्रवारी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकाराने दोनशे लसीकरण वाहन वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर हे कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे ऑनलाइन सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, मनपातील काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
मात्र, ज्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम होता ते पश्चिम नागपूरचे आमदार तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे कार्यक्रमाकडे फिरकलेसुद्धा नाहीत. त्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद कायम असल्याचे अनेकांना जाणवले. याचवेळी देवडिया भवन येथे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावनादिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे आपसूकच कार्यकर्ते विभागले गेले.
अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना नागपूर जिल्हाच नव्हे तर विदर्भातील त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्यावेळी चतुर्वेदी गटामार्फत प्रती कार्यक्रम घेतला जात होते. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांची जयंती व स्मृतिदिनाचेही कार्यक्रम एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी केले जात होते. शाई फेक प्रकरणानंतर चतुर्वेदी यांना निलंबित करण्यात आले होते. काँग्रेसमध्ये परतल्यानंतर तेव्हापासून ते फारसे सक्रिय नाहीत. महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ते दिसत नव्हते. लसीकरण वाहन वाटपाच्या कार्यक्रमांना मात्र आवर्जून उपस्थित होते. थोरात प्रदेशाध्यक्ष असतानाच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. त्याची उतराई म्हणून ते उपस्थित होते असे समजते.
इतिहासाची पुनरावृत्ती?
सहा महिन्यांनंतर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. शहराध्यक्ष विकास ठाकरे हेच आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलले आहे. नाना पटोले हे ठाकरे गटालाच ‘फेव्हर’ करतात असा त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे मनपा तिकीट वाटपाच्या वेळी पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता काँग्रेसच्या वर्तुळात वर्तविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.