नागपूर : पक्ष कॉंग्रेस. पद कॉंग्रेस कमिटीमध्ये सचिव. राजकारणासह रॉकेल विक्रीचा व्यवसाय. यामुळे अनेक नागरिकांशी ओळख. याचाच लाभ घेत या नेत्याने दुसरास व्यवसाय सुरू केला. एका महिलेला लायसन्स तयार करायचे होते. या नेत्याने ओळखीचा फायदा घेत महिलेशी संपर्क साधला. राजकीय पक्षाचा नेता असल्याने माझ्या ओळखीने लायसन्स लवकर मिळेल असे आश्वासन महिलेला दिले. त्याच्या आश्वासनाला महिला बळी पडली आणि पुढील घटनाक्रम घडला...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीना दिगांबर नारनवरे (वय 40, रा. मिलिंदनगर, खामला) यांना केमिकल फॅक्टरीचे लायसन्स काढायचे होते. यामुळे त्या प्रयत्न करीत होत्या. मात्र, काय करावे आणि काय नाही, हेच त्यांना समजत नव्हते. अशात या नेत्याने महिलेशी संपर्क साधला. महिलेचे पती दिगांबर आणि या नेत्यांमध्ये जुनी ओळख होती. त्यामुळे महिलेने त्याच्यावर विश्वास केला.
राजकीय पक्षाचा नेता असल्याने माझ्या ओळखीने केमिकल फॅक्टरीचे लायसन्स लवकर मिळवून देतो असे आश्वासन या नेत्याने लीना यांना दिले. जानेवारी 2019 मध्ये त्याने हे आश्वासन दिले होते. या कामासाठी त्याने लीना यांच्याकडून वेळोवेळी 10 लाख रुपये घेतले. सहा महिने उलटल्यानंतरही लीना यांना लायसन्स मिळाले नाही.
यामुळे लीना यांनी या नेत्याला लायसन्सबाबात विचारायला सुरुवात केली. यानंतर हा नेता लीना यांना टाळाटाळ करू लागला. लायसन्स मिळत नसल्याचे पाहून लीना यांनी नेत्याला पैसे परत मागितले. मात्र, त्याने पैसे परत देण्यास नकार दिला. "आता तुमचे लायसन्स बनू शकत नाही. जे पैसे तुम्ही दिले तेही परत मिळणार नाही' असे उत्तर नेत्याने महिलेला दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नारनवरे दाम्पत्याने प्रतापनगर पोलिस ठाण्यात या नेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
उमेश पिंपळे असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो गोकुळपेठ मार्केट रोड येथे राहतो. उमेश हा शहर कॉंग्रेस कमिटीमध्ये सचिव होता. कुटुंबातील सदस्याकडून मनपाची निवडणूकही लढवून घेतली होती. एका मोठ्या नेत्याशी उमेशचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती आहे. तो स्वतः रॉकेलचा व्यवसाय करतो. राष्ट्रीय नेत्याच्या जवळचा असल्याची बतावणी लोकांना करीत असतो. यामुळे लीना त्याच्या जाळ्यात अडकली. केमिकल फॅक्टरीचे लायसन्स मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने लीना यांच्याकडून दहा लाख रुपये वसूल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.