कोदामेंढी : मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचे पाहिले आणि ऐकले आहे. त्याच अनुषंगाने विहीर चोरीला गेल्याचा प्रकार यापूर्वी खरडा येथे घडला होता आणि तो ‘सकाळ’ने मांडला होता. मात्र आता चक्क घरकुलाचे बांधकामच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
मौदा तालुक्यातील नांदगाव (कोदामेंढी) येथे एक दोन नाही तर १४ घरकुलाचे बांधकाम चोरीला गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. नागपूर महानगर विकास प्राधिकरण विभागाचे अभियंता वैभव कांबळे यांना गावात बोलावून घरकुलाचे बांधकाम नेमके कुठे झाल्याचे दाखविण्यासाठी भाग पाडले आणि राडा घातला.
नांदगाव येथे ८४ लाभार्थीयांची घरकुलाची यादी मंजूर करण्यात आली. त्यापैकी काहींना एक लाखाचे अनुदान घरकुल बांधकाम करण्यासाठी मिळाले असून केवळ आठ दहा लाभार्थीयांना अनुदान येणे बाकी आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ज्यांनी बांधकाम पूर्ण केले अशांना संपूर्ण अनुदान मिळाले नसून ज्यांनी बांधकाम अजिबात केलेच नाही, अशांना मात्र संपूर्ण अनुदान वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे १४ लाभार्थीयांनी कसलेही बांधकाम केले नसून मात्र अनुदानाचे संपूर्ण अडीच लाख वाटप करण्यात आले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ज्यांचे कवेलूचे कच्चे मकान आहेत, असे जवळपास तीस कुटुंबीयांना अद्याप घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. एकाच कुटुंबात तीन ते चारदा लाभ देण्यात आला असून ज्यांचे पक्के मकान आहेत, अशांना देखील लाभ देत काहींनी तर वरच्या मजल्यावर बांधकाम केले.
मात्र जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यात आला नसल्याने ग्रामस्थ संतापले. अभियंता वैभव कांबळे यांना गावात फिरवून बोगस लाभार्थी आणि पैशाची उचल करून बांधकाम न झालेले ठिकाण दाखविण्यात आले व राडा घातला. तंटामुक्त समिती आणि ग्रामस्थांनी याबाबतचा ठराव घेतला. यावेळी ग्रामस्थांचा रोष ग्रामपंचायत प्रशासनावर देखील होता.
यावेळी सरपंच अनिल पडोळे, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर आष्टणकर, पोलिस पाटील योगिता सलामे, किशोर काठोके, ग्रा. पं. सदस्य कैलास महादुले, मंसाराम थोटे, महादेव देशमुख, चन्नेश्वर पडोळे, अजित पडोळे, मंसाराम सेलोकर, रामेश्वर थोटे, आकाश पडोळे आदिसह पाच पन्नास ग्रामस्थ यावेळी होते.
असा झाला गैरप्रकार
दहा वर्ष जुन्या बांधकामावर अनुदानाचा लाभ
एकाच कुटुंबात तीन ते चारदा घरकुलाचा लाभ
पक्के मकान असलेल्या कुटुंबीयांना लाभ
१४ घरकुलाचे बांधकाम चोरीला गेल्याचा आरोप
बांधकाम पूर्णत्वास झालेल्यांना सहा महिन्यापासून शेवटचा लाभ नाही
तीस हजार दिल्यास संबंधित यंत्रणेची काम करण्याची तत्परता.
फोटो काढणे आणि त्यानुसार फाइल प्रोसेस करणे एवढेच माझे काम आहे. मी कुणाकडून पैसे घेतलेले नाही. ज्यांना अनुदान वाटप केले त्यांचे जुने बांधकाम आहे.
-वैभव कांबळे, अभियंता (गृहनिर्माण) नागपूर महानगर विकास प्राधिकरण
कुणाला किती पैसे मिळाले हे माहित नाही. फक्त नकाशे तयार करण्यापर्यंत मला माहिती आहे.
-अनिल पडोळे, सरपंच नांदगाव
गावकऱ्यांनी आज अभियंत्यांसोबत चौकशी केली असता नियोजित ठिकाणी बांधकाम आढळून आले नाही. ज्यांचे सिमेंट कॉँक्रिटचे पक्के मकान आहेत, अशांनी वर बांधकाम केले. मात्र सरपंचाचे सहयोगी असतात त्यांना लाभ दिला जातो. पैशाची उचल करून बांधकाम झालेच नाही. म्हणजेच घरकुलाचे बांधकाम चोरीला गेले आहे.
-चन्नेश्वर पडोळे, ग्रामस्थ
अभियंत्यांनी ज्या लोकांनी बांधकाम केले नाही त्यांना आमिष दाखवून बांधकाम न करता पैसे काढून दिले. यावर उच्चस्तरिय चौकशी लागणे गरजेचे आहे. प्रशासकीय चौकशी तातडीने लावून दोषीवर कारवाई करण्यात यावी.
-महादेव देशमुख, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.