नागपूर : पंधरा दिवसांपूर्वी मेडिकलच्या ऑपरेशन थिऐटरमध्ये इम्प्लान्ट विक्रेत्याने ब्रदरला मारहाण केली होती. ही घटना ताजी असताना मंगळवारी (ता.२४) डॉक्टरने ऑनलाइन सीस्टिम सांभाळणाऱ्या इंजिनिअरला मारहाण केली. विशेष असे की, इंजिनिअरला मारहाण झाल्यामुळे ऑनलाइन सीस्टिम सांभाळणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांनी काम बंद केले. यामुळे सर्व ऑनलाइन सीस्टिम कोलमडली.
मेडिकलच्या मेडिसीन कॅज्युअल्टीमध्ये मारहाण झालेल्या इंजिनिअरचे नाव श्याम कुमरे असे आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम (एचआयएमएस प्रणाली) अंतर्गत ऑनलाइन सीस्टिम तपासणीसाठी अधिष्ठाता कार्यालयाजवळ ऑनलाइन प्रणाली लावली आहे. तेथे श्याम कुमरे कार्यरत आहेत. तक्रार आल्यामुळे येथे पाहणी करण्यासाठी आले. येथून परतत असताना डाटा एन्ट्री ऑपरेटरला ‘चल’ असे म्हटले. मात्र, येथे कर्तव्यावरील निवासी डॉक्टरचा गैरसमज झाला.
महिला निवासी डॉक्टरची छेड काढल्याचे डॉक्टरला वाटले आणि कसलीही विचारपूस न करता निवासी डॉक्टरने महिला डॉक्टरलाच चल म्हटले अशी समजूत करीत इंजिनिअरला बेदम मारले. लाथा बुक्या आणि जोड्याने मारहाण केली. भिंतीवर डोकं आपटले. इंजिनिअरचा मोबाईलदेखील तोडल्याची माहिती ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.
यामुळे संतप्त झालेल्या ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. दुपारी ३ वाजतापासून ऑनलाइन कार्ड काढणे बंद केले. यामुळे रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची दादागिरी नेहमीचीच असून सर्व कर्मचारी त्रस्त असल्याची तक्रार वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शिल्पा लांजेवार यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, निवासी डॉक्टरांनीही बाजू मांडली. रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन सेवा बंद होती. दोघांमध्ये समेट घडवून आणण्यात वैद्यकीय कार्यालय यशस्वी झाले.
सुरक्षारक्षकांची बघ्याची भूमिका
मेडिकलच्या आपत्कालीन विभागात निवासी डॉक्टरकडून इंजिनिअरला मारहाण होत असताना महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात होते. मात्र, त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतला. एकही सुरक्षा रक्षक होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी पुढे आला नाही, अशी तक्रार ऑनलाइन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली.
अशी कोलमडली ऑनलाइन सेवा
कार्ड काढण्यासाठी ऑनलाइन नोंद होते. तीन नंतर एकही कार्ड काढले नाही. यामुळे रुग्ण कार्डासाठी ओरडत होते.
रक्त तपासणी, एक्स-रे ऑनलाइन अपलोड करण्याचे काम थांबले. यामुळे डॉक्टरांना रुग्णांचे एक्स-रे ऑनलाइन बघता आले नाही
कार्ड न निघाल्यामुळे रुग्णांना चार तास ताटकळत बसावे लागले. त्यांना उपचारापासून दूर राहावे लागले.
पाच तास उलटून गेल्यानंतर रुग्णांची गर्दी वाढल्यानंतर ऑनलाइन कार्ड तयार करण्याच्या सूचना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.