नागपूर : गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवानंतर महत्त्व असलेल्या महाशिवरात्री महोत्सवासाठी शिवमंदिरे सजली आहेत. नंदीवर स्वार असलेल्या भोळ्या शंकराच्या दर्शनासाठी त्याचे गण आतुर झाले आहेत. महाशिवरात्रीचा महोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच होय. नागपूर जिल्ह्यातील आंभोरा, कपिलेश्वर, नगरधन, महानागबळेश्वर, रामधाम, महादेव घाट, अंबाखोरी येथील शिवमंदिर महाशिवरात्री महोत्सवासाठी सजली आहेत.
वैनगंगा, कन्हान, आम, मुर्झा आणि कोलार या पाच नद्यांच्या संगमावर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्री चैतन्यश्वेर महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. नागपूरवरुन पाचगाव, डोंगरगाव, कुही, मांढळ, पचखेडी, वेलतूर मार्गे ८० किमी आणि भंडाऱ्यावरून १८ किमी अंतरावर कुही तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आंभोऱ्याचे देवालय आहे. नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीवर केबल पूल बांधल्याने यावर्षी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
स्वामी हरीहरनाथ यांनी या ठिकाणी बारा वर्षे पशुपतव्रत करून मोठा यज्ञ केला, अशी माहिती विवेकसिंधू ग्रंथात आहे. याच यज्ञातून शिवशंकर महाप्रभू चैतन्यश्वेर रूपाने प्रगटले होते, अशी आख्यायिका आहे. या तीर्थक्षेत्राला सरासरी ९०० वर्षापूर्वी ‘अंभ’ म्हटले जात असे. मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधुची रचना याच ठिकाणी शके १११० (इ.स. ११८८) ला मुकुंदराज स्वामींनी हरीहरनाथांच्या समाधीसमोर केली. पर्वतावर देखना कोल्हासूर तर बाजूलाच प्राचीन बौद्ध विहार आहे.