नागपूर : मोबाईल, कार्टून्स, इंटरनेट, गेम्स, युट्यूब अशा विविध माध्यमांनी शिशू गटातील मुलांच्या मराठी पुस्तकांवर मात केली आहे. बाल गोपालांच्या चांदोबा, चाचा चौधरी सारख्या पुस्तकांना वाचनालयातून, पुस्तकांच्या दुकानांमधून बाद केले आहे. तसेच, खास या गटासाठी लिहिणारा लेखक वर्ग बोटावर मोजण्याइतका उरला असल्याचे वास्तव या क्षेत्रातील जाणकारांनी मांडले.
तंत्रज्ञानाबरोबरच ९० टक्के मराठी मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकत असल्याने त्यांना मराठी पुस्तकांमध्ये रस उरलेला नाही. तसेच, जी मुले मराठी माध्यमात शिकतात त्या मुलांच्या पालकांची ही पुस्तके विकत घेण्याची ऐपत नाही. त्यामुळे या पुस्तकांना बाजारामध्ये तुलनेने कमी मागणी आहे. या बरोबरच शिशूंच्या मानसिकतेचा अभ्यास करून, या वयोगटातील मुलांचे निरीक्षण करून, प्रगत युगातील मुलांच्या आवडी निवडी बघून लिहिणारे लेखक मोजकेच आहेत. याचाही परिणाम या विभागातील पुस्तकांवर होतो आहे.
शिशू गटासाठी लिखाण करताना शिशू होऊनच लिखाण करावे लागते. आकर्षक वाटण्यासाठी पुस्तकांमध्ये चित्रांची संख्या जास्त असावी. भरपूर चित्रे असल्यास मुलांना ते पुस्तक आपल्या संवंगड्यासारखे वाटेल.
-भालचंद्र देशमुख, बाल साहित्यिक
शिशू गटासाठी लिहिणाऱ्या लेखकांची संख्या फारच कमी आहे. साधारण: इयत्ता तिसरी-चौथीच्या वरील मुलांसाठी साहित्याची निर्मिती केली जाते. त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लिहिणे ही एक कलाच आहे. मोजक्या लेखकांनाच शिशू गटातील मुलांसाठी लेखन करता येत.
-जयंत मोडक, संपादक, मुलांचे मासिक
शिशू गटासाठीच्या पुस्तकांची मागणी अतिशय कमी झाली आहे. मात्र, मोबाईलच्या या युगामुळे या प्रकारातील वाड्मय घटले आहे. शिवाय, या पुस्तकांची आकर्षक व कलरफुल स्वरूपामध्ये छपाई करावी लागत असल्याने त्याला खर्च देखील जास्त येतो. पालकांनी मुलांना मोबाईल ऐवजी पुस्तकाची गोडी लावायला हवी.
-सचिन उपाध्याय, विजय प्रकाशन
मुलांना स्क्रीन टाईमचे व्यसन असल्याने पुस्तकांची गोडी लावायला थोडे कठीण जाते. आमच्या वाचनालयात दहा महिन्यांपासूनचे सभासद आहेत. मुलांना पुस्तकाची ओळख करून द्यायला वयाचे कुठलेही बंधन आडवे येत नाही. एक ते दीड वर्षाच्या वयात मुलांना पुस्तके द्यायला हवी. मुल सात वर्षाचे झाले की पुस्तकांची गोडी लागायला समस्या निर्माण होतात.
-डॉ. पल्लवी बापट-पिंगे, संचालक, रीडिंग किडा लायब्ररी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.