नागपूर : संघभूमी आणि दीक्षाभूमी अशी ओळख असलेल्या नागपूर शहरासह जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही स्टार प्रचारक नेता प्रचारासाठी आला नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहे. नागपूरमध्ये दोन-चार नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, रामटेकमध्ये एकही नेता अद्याप फिरकला नाही.
नागपूरमध्ये भाजपचे हेवीवेट नेते, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आमदार विकास ठाकरे लढत देत आहेत. विदर्भाचे मुख्यालय नागपूर असतानाही काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्यांची येथे अद्याप सभा झाली नाही. नाही म्हणायला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक या दोन नेत्यांनी विकास ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला हजेरी लावली. मात्र, हे दोन्ही नेते चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आले होते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी नागपूरमार्गे भंडारा आणि चंद्रपूरला जाणार आहे. नागपुरातून नितीन गडकरी भाजपचे उमेदवार आहेत. त्यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत उत्तम संबंध आहेत. सोनिया गांधी यांनी संसदेत त्यांच्या कामाची प्रशंसा केली होती. भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नव्हते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना शिवसेनेत येण्याची ‘ऑफर’ दिली होती. गडकरी यांची पक्षापलीकडे असलेली मैत्री जोपासण्यासाठी कदाचित काँग्रेसचे बडे नेते नागपुरात प्रचारासाठी येत नसावेत, अशी कुजबूज ऐकायला येत आहे.
नागपूरला लागून असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाला काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी वाळीत टाकले असल्याची शंका काँग्रेसचेच कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. मुकुल वासनिक, रमेश चेन्निथला हे नेते नागपूरसह पूर्व विदर्भातील मतदारसंघात प्रचार यात्रा आणि सभांमध्ये सहभागी झाले होते. हे दोन्ही नेते नागपूरमध्ये मुक्कामी होते. मात्र, यापैकी कुणीही रामटेक मतदारसंघात गेले नाही. विशेष म्हणजे मुकुल वासनिक हे रामटेकचे खासदार होते. त्यांचे कट्टर समर्थक तसेच प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी येथून बंडखोरी केली आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. हेही कारण वासनिक यांनी रामटेक टाळण्यामागे असावे, असे बोलले जात आहे.
दुसरीकडे माजीमंत्री सुनील केदार यांनी या निवडणुकीचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. रश्मी बर्वे यांची जात पडताळणी धोक्यात असल्याचे ठाऊक असतानाही त्यांच्या उमेदवारीसाठी ते आग्रही होते. याला काँग्रेसमधून कुणी विरोधही केला नाही. अखेर रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. त्यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. केदारांच्या हट्टी व आक्रमक स्वभावामुळे येथे कोणी येत नसल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे भाजपने येथे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेत केदारांना ललकारले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.