नागपूर : राज्यातील अनेक जिल्ह्यासह नागपुरातही लम्पी आजाराची २० जनावरांना लागण झाली आहे. एकाचा मृत्यू झाला. या आजाराच्या प्रतिबंधासाठी कोरोनाच्या धर्तीवर जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत असून रोज बैठका घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिली.
सावनेर तालुक्यातील बडेगाव व उमरीनंतर हिगंणा तालुक्यातील जुनापाणी या गावात लम्पी झालेले जनावर आढळले. यातील बडेगाव येथील तीनमधील एका संशयित जनावराचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगिलते. बाधित जनावर मिळालेल्या गावातील पाच किलो मीटरच्या परिघात जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून सावनेर तालुक्यात २२३२ तर हिंगणा तालुक्यात १४०० जनावरांना लस देण्यात आली. बाहेरून येणाऱ्या जनावरांचेही लसीकरण करण्यात येईल.
जिल्हा परिषद व राज्याचा पशुसंवर्धन व महसूल विभाग यांच्या संयुक्तरित्यावर उपाययोजना केल्या जातील. त्यांचा रोज व्हीसीद्वारे आढावा घेण्यात येईल. जनावरांचे विलगीकरणही करण्यात येईल. डीपीसीमधून एक कोटींचा निधी फवारणी, गोठे साफ किंवा इतर कामावर खर्चास शासनाने परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलीक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहन खंडारे उपस्थित होते.
औषध फवारणीवर फोकस
‘लम्पी त्वचारोग’ हा पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये थैमान घालून आता महाराष्ट्रात वेगाने पसरताना दिसत आहे. याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासोबतच फवारणीवर फोकस ठेवण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी गुरूवारी दिल्या.
विभागाकडून अध्यक्षांना अपूर्ण माहिती
जिल्ह्यात लम्पीचे गुरूवारी हिंगणा तालुक्यातील जुनापाणी येथे ९ बाधित जनावरे आढळली. परंतु याची माहिती पशुसंवर्धन विभागाने अध्यक्षा बर्वे यांना दिलीच नाही. बर्वे यांनी येथे फक्त दोनच जनावरे मिळाल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे बडेगाव येथे एका जनावराचा बुधवारी मृत्यू झाला. त्याचीही माहिती अध्यक्षांपासून लपवून ठेवली. विभागाने अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना अपूर्ण माहिती दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे दिसते.
प्रसंगी सेस फंडातून लसींची खरेदी : बर्वे
जिल्ह्यातील सावनेर व हिंगणा तालुक्यातील काही गावांमधील पशुधनांमध्ये लम्पी सदृश लक्षणे दिसून येत आहे. त्यांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत. खबरदारी म्हणून दोन्ही तालुक्यात लसीकरणाला सुरु केले आहे. शासनाकडून प्रत्येक तालुक्यासाठी १० हजाराप्रमाणे जिल्ह्याला १.३० लक्ष लसी दिल्या जातील. अधिक लसींची गरज असल्यास व शासनाकडून पुरवठा होण्यास विलंब झाल्यास प्रसंगी पशुधनांच्या हितार्थ जि.प.च्या सेस फंडातून लस खरेदी करू, असे जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी पत्रकारांना सांगितले. बाधित गावाच्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनावरांच्या गोठ्यात कीटकनाशक फवारणी सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाला चार लाखांचा निधी जनजागृतीसाठी दिल्याचे सभापती तापेश्वर वैद्य यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे, सभापती उज्ज्वला बोढारे, नेमावली माटे, सदस्या अवंतिका लेकुरवाळे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळी माहिती
पशुसंवर्धन विभागाने हिंगणा तालुक्यात १४५० जनावरांचे लसीकरण केल्याचे अध्यक्षा रश्मी बर्वे यांना सांगितले. तर जिल्हाधिकारी यांना १४०० जनावरांचे लसीकरण झाल्याचे सांगितले. पदाधिकारी व अधिकाऱ्यांना वेगवेगळी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याने अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसते.
हा आजार फक्त जनावरांना होतो. जनावरांपासून माणसाला होत नाही. जनावरांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे कुणीही घाबरू नये. जनावरांमध्ये लक्षणे दिसताच ग्रामपंचायत, ग्रामसेवक किंवा तलाठ्यांना माहिती द्यावी.
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.